सांगोला : राजमाता प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष व नगरपरिषदेचे गटनेते आनंदा माने व जिल्हा परिषद सदस्य अतुल पवार यांनी सांगोला तालुक्यातील सुरू असलेल्या ६१ ग्रामपंचायत निवडणुकीत मा.आ. गणपतराव देशमुख यांच्या नेतृत्वाखाली ' शेकाप'च्या उमेदवारास पाठिंबा जाहीर केल्याने तालुक्यात राजकीय खळबळ उडाली आहे .
सांगोला शहर व तालुक्यात आनंदा माने यांना मानणारा मोठा गट आहे . सध्या त्यांच्या पत्नी राणी माने या सांगोला नगरपरिषदेच्या लोकनियुक्त नगराध्यक्षा आहेत . आनंद माने यांनी २०१६ मध्ये झालेल्या नगरपरिषद निवडणुकीत महाविकास आघाडी स्थापन करून स्वतः निवडणूक लढविली होती व ते स्वतः भरघोस मतांनी निवडूनही आले होते . तर पत्नी राणी माने यांना २ ९ ०१ मतांची आघाडी घेऊन विजयी केले होते . तसेच महायुतीचे ९ नगरसेवकनिवडून आले होते . त्यामुळे शहर व तालुक्यात आनंद माने या नावास निश्चित मोठे वलय आहे . तर जिल्हा परिषद निवडणुकीत अतुल पवार हे एखतपूर गटातून मोठ्या मताधिक्याने निवडून आले होते . तालुक्यात या दोन युवा नेत्यांनी गतवर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत शहाजीबापू पाटील यांना निवडून आणण्यात कोणतीही कसर ठेवली नव्हती . सांगोला नगरपरिषदेच्या निवडणुका पुढील वर्षी होणार आहेत . त्या अनुषंगाने गटनेते आनंदा माने यांचा निर्णय महत्त्वपूर्ण मानला जात आहे . या दोन युवा नेत्यांनी आपले स्वतंत्र अस्तित्व ठेवण्यासाठी सध्या सुरूअसलेल्या ६१ ग्रामपंचायत निवडणुकीत मा.आ. गणपतराव देशमुख यांच्या शेतकरी कामगार पक्षाच्या उमेदवारास जाहीर पाठिंबा दिला आहे व आपल्या कार्यकर्त्यांना निवडणुकीत प्रचाराचे आदेश दिले आहेत . त्यामुळे ग्रामपंचायत निवडणुकीत शेकाप कार्यकर्त्यांना बळ मिळणार आहे . जिथे गरज असेल तिथे गटनेते आनंदा माने व जि.प. सदस्य अतुल पवार शेकापच्या उमेदवाराचा प्रचार करून निवडून आणण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे आनंदा माने व अतुल पवार यांनी सांगितले .


0 Comments