सांगोला / प्रतिनिधी : शासनाच्या आदेशाप्रमाणे प्रत्येक शासकीय कार्यालये , शाळा , महाविद्यालये अशा संपूर्ण कार्यालयांमध्ये २६ नोव्हेंबर रोजी संविधान दिनी संविधानाची प्रस्तावना वाचन करणे हे बंधनकारक केले आहे . त्या अनुषंगाने सांगोला नगरपालिकेच्या कार्यालयामध्ये संविधान प्रस्तावना वाचनाचा कार्यक्रम करण्यात आला .
यावेळी नगरसेवक सुरजदादा बनसोडे यांनी संविधानाचे महत्त्व पटवून देत असताना संविधानामुळे माणसाला मूलभूत हक्क मिळाले व स्त्री - पुरूष समान हक्क मिळाले . त्याचबरोबर त्या संविधानामध्ये माणसांबरोबर जनावरांनासुध्दा काही तरतुदी करण्यात आल्या आहेत . परंतु हे संविधान ठराविक एका समाजाच्या महापुरूषाने लिहिले असल्यामुळे त्याचे महत्त्व इतरांना जाणवत नाही . शिवाय इतर धर्मांध व जातीयवादी त्याचे महत्त्व समजू दिले नाही . उलट माणसा - माणसांत व जाती जातीत भेदभाव करणारी मनुस्मृती रूजविण्याचा प्रयत्न केला जात आहे . ज्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना या समाजव्यवस्थेने नाकारले होते , ज्यांना शाळेत बसून शिक्षण घेण्याचा अधिकारदेखील नव्हता , बाहेर बसून त्यांनी शिक्षण घेतले . आणि आज ते आधुनिक भारताचा घटना शिल्पकार म्हणूनजगभर प्रसिध्द झाले . हे संविधान लिहिण्यासाठी त्यांना २ वर्षे ११ महिने आणि १८ दिवस इतका प्रदीर्घ कालावधी लागला . वास्तविक पाहता आज आपल्या नगरपालिकेत नगराध्यक्ष म्हणून एक महिला आहे . नगरसेविका म्हणून ५० टक्के महिला आहेत . याच नगरपालिकेच्या शासकीय कार्यालयात शासकीय अधिकारी म्हणून महिलाच आहेत . हे सर्व त्यांना संविधानाने दिलेले अधिकार आहेत . हे त्यांनी विसरू नये . परंतु काही धर्मांध शक्ती संविधानाच्या विरोधात मनुस्मृती रूजविण्याचा प्रयत्न करत आहेत . ज्या मनुस्मृतीमध्ये ठराविक समाजाचे प्रतिनिधीत्व आणि आणि इतर समाजाची गुलामगिरी रूजवलेली आहे , ज्या मनुस्मृतीमध्ये महिलांसाठी अतिशय विचित्र चालीरिती होत्या जसे , स्त्रियांनी घराबाहेर न पडणे , चूल व मूल हेच पाहणे , शिक्षण न घेणे , नोकरी न करणे किंवा राजकीय क्षेत्रात न येणे , पतीच्या निधनानंतर सती जाणे अशा अनेक प्रथा या संविधानामुळे मोडकळीस आल्या . म्हणून हे संविधान वाचविणे हे स्त्रियांचेच आद्यकर्तव्य आहे . संविधानामुळेच हा देश लोकशाही प्रधान देश झाला आहे . घटनेत Bharat is India and India is Bharat हाच उच्चार करणे कायद्याने बंधनकारक आहे . पण काही जातीयवादीजाणीवपूर्वक भारताचा हिंदुस्थान असा उल्लेख करतात . तसा उल्लेख करणे हे कायद्याने चुकीचे आहे . म्हणून हे संविधान सार्वभौमत्ववाद आहे . म्हणून भारत देश हा असाच अजरामर ठेवावयाचा असेल तर संविधानाची प्रस्तावना फक्त वाचन करणे महत्त्वाचे नसून ते संविधान वाचविणे हीच काळाची गरज आहे . आणि काही अज्ञान लोक जे शिक्षण व ज्ञानाने कमी आहेत , ते या संविधान बदलाविषयी बोलतात , ज्या बाबासाहेबांनी संविधान लिहिले त्यांना २३ पदव्या व ९ भाषा अवगत होत्या . अशा महापुरूषाने हे संविधान अभ्यासपूर्ण सर्वांचे हित जोपासून लिहिले आहे . अशा व्यक्तीचा संविधानाच्या विरोधात बोलणे म्हणजे मूर्खपणाचे लक्षण आहे . असे नगरसेवक सुरजदादा बनसोडे यांनी आपल्या मनोगतात व्यक्त केले . यावेळी नगरपालिकेचे मुख्याधिकारी कैलास केंद्रे व नगराध्यक्षा राणीताई माने यांनीही आपले विचार व्यक्त करून संविधान वाचन दिनाला शुभेच्छा दिल्या हा कार्यक्रम नगराध्यक्षा राणीताई माने , मुख्यधिकारी कैलास केंद्रे , नगरसेविका अनुराधा खडतरे , बहुजन समाज पार्टीचे कालिदास कसबे , समाधान कोळी यांच्यासह नगरपरिषदेचे अधिकारी व कर्मचारी यांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला .


0 Comments