महूद बु. ग्रामपंचायतीला बिडीओ चा दणका ; मासिक सभेमध्ये ठराव घेवून केलेल्या चुकीच्या नोंदी रद्द करण्याचे आदेश !
महूद हे सुमारे वीस हजार लोकसंख्येचे गाव. जत-मुंबई व पंढरपूर-मल्हारपेठ अशा दोन मुख्य राज्य मार्गांच्या छेदन बिंदूवर स्थिरावले आहे. परिसरातील पंधरा-वीस खेड्यांची हक्काची बाजारपेठ म्हणून या गावाचा लौकिक आहे.येथे व्यापार,उद्योग यांची बरकत होण्यास मोठा वाव आहे.विशेषतः महामार्गालगतच्या जमिनी या दृष्टीने महत्त्वाच्या बनल्या आहेत. महूद ग्रामपंचायतीच्या कारभाराबाबत माहिती देताना श्लेषा कारंडे यांनी सांगितले की, पंढरपूर-मल्हारपेठ महामार्गालगत त्यांची वडलोपार्जित मालकीची वहिवाटीची जमीन आहे.गट क्रमांक १९२७ व १९२८ मध्येे कोणतेही गावठाण नाही.याबाबत महसूल व भूमी अभिलेख कार्यालयाकडील पुराव्यात गावठाण पुराव्यांची कसलीही नोंद नाही.तरीही महूद ग्रामपंचायतीने २६ जून २०१९ च्या मासिक सभेत ठराव घेऊन या खाजगी मालमत्तेत गावठाण दाखविले आहे. आणि वैयक्तिक मालकीच्या जागेत दुसऱ्याच व्यक्तीच्या मालमत्ता क्रमांक ३५१३ ची बेकायदेशीर नोंद केली आहे.
नागरिकांच्या मूलभूत हक्काचे संरक्षण करण्याऐवजी महूद ग्रामपंचायतीने अतिक्रमणास प्रोत्साहन दिले आहे. अतिक्रमण करणाऱ्याने ग्रामपंचायत उताऱ्याचा आधार घेत,राजकीय ताकद व मनुष्यबळ यांचा वापर करून २६ ऑक्टोंबर २०२० पासून या क्षेत्रात अतिक्रमण केले आहे.अगोदर बेकायदेशीर नोंद व नंतर दीड वर्षाने बेकायदेशीर अतिक्रमण करण्याचा हा प्रकार ग्रामपंचायतीने संबंधित भोगवटादार यांच्याशी संगनमत करून केला आहे.ग्रामपंचायतीच्या या बेकायदेशीर कृत्या विरुद्ध श्लेषा कारंडे यांनी गटविकास अधिकारी कार्यालयासमोर उपोषण करून ही बेकायदेशीर नोंद रद्द करून अतिक्रमण तात्काळ हटविण्यात यावे अशी मागणी केली.
गट विकास अधिकारी यांनी याबाबत चौकशी करून या नोंदी रद्द करण्याचा आदेश दिला आहे.या नोंदी निव्वळ अर्जदाराच्या अर्जानुसार व सरपंच यांच्या सहीने मंजूर करण्यात आल्या आहेत. अर्जा सोबत कोणताही मालकी दर्शक पुरावा जोडलेला नाही.शिवाय आयत्या वेळच्या विषयांमध्ये यास मंजुरी दिली आहे.विशेष म्हणजे ग्रामपंचायतीच्या मालमत्ता नोंद वही क्रमांक २४ मध्ये ही जागा गावठाण असल्याबाबतचा कोणताही सक्षम पुरावा नाही. यावेळी ग्रामसेवकाने आपले कायदेशीर मत ग्रामपंचायत सदस्यांना अवगत करणे आवश्यक असताना केले नाही. त्यामुळे या नोंदी चुकीच्या पद्धतीने केलेल्या असून ग्रामपंचायत अधिनियम १९५८ च्या कलम ३७ नुसार या चुकीच्या नोंदी रद्द करणेबाबत कार्यवाही करावी असे ग्रामपंचायतीस आदेशीत केले आहे.
राजकीय पाठबळाचा गैरवापर करत ग्रामपंचायतीला हाताशी धरून सत्तेचा दुरुपयोग करून मनुष्यबळाच्या जोरावर सामान्य नागरिकांच्या जागेत अतिक्रमण करायचे. आणि ग्रामपंचायतीकडे गावठाण मालमत्ता नोंद करून हे अतिक्रमण कायदेशीर करून घेण्याचा प्रकार महूद मध्ये वाढीस लागला आहे असेही श्लेशा कारंडे यांनी सांगितले. अशा या गैरप्रकारामुळे महामार्गालगत असणाऱ्या मालमत्ताधारका मध्ये व शेतकऱ्यांमध्ये भीतीदायक वातावरण निर्माण झाले आहे.गटविकास अधिकारी यांच्या आदेशाप्रमाणे ही बेकायदेशीर नोंद तात्काळ रद्द होऊन अतिक्रमण न हटविल्यास जिल्हाधिकारी कार्यालयासमोर १५ डिसेंबर रोजी उपोषण करणार आहे असेही श्लेशा कारंडे म्हणाल्या.
*मुळशी पॅटर्न प्रमाणे महूद पॅटर्न*
संघटित गुंडगिरीच्या मदतीने सामान्य नागरिकांच्या जमीनी बळकावण्या बाबतचा गंभीर विषय 'मुळशी पॅटर्न' या चित्रपटात दाखवला आहे.राजकीय पाठबळ,मनुष्यबळ यांचा वापर करून ग्रामपंचायत दप्तरी गावठाण नसलेल्या खाजगी मालमत्तेच्या क्षेत्रांत बेकायदेशीरपणे ग्रामपंचायत मालमत्ता नोंद करावयाची.व सामान्य नागरिकांची खाजगी मालमत्ता मनगटशाही वर लुबाडायची आशा "महूद पॅटर्नची" दहशत येथे पसरली आहे.पुरोगामी महाराष्ट्रात हे प्रकार घडत आहेत.मात्र या "महूद पॅटर्न"विरोधात आपण अखंडपणे लढत राहू असेही श्लेशा कारंडे यांनी सांगितले.
*गैरकारभार व ग्रामसेवक*
तात्कालिन ग्रामसेवकाने महूद येथे असताना अनेक चुकीची कामे केली आहेत.मासिक सभेत विषय न घेता पुन्हा विषय इतिवृत्तात घालून ग्रामपंचायत जागा परस्पर भाड्याने दिल्याचा प्रकार घडला होता. तेव्हा ग्रामसेवका विरोधात ९ सदस्यांनी गटविकास अधिकार्यांकडे अर्ज केला होता.


0 Comments