महूद-कटफळमध्ये दुष्काळी पाहणी; शेतकऱ्यांना तातडीने मदत देण्याची आमदार देशमुखांची मागणी
महूद/कटफळ : सांगोला तालुक्यातील दुष्काळी परिस्थितीची पाहणी करण्यासाठी महूद व कटफळ परिसरात पाहणी दौरा करण्यात आला.
यावेळी शेतकऱ्यांच्या अडचणी आणि दुष्काळामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा प्रत्यक्ष आढावा घेण्यात आला.
सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख, जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन,
प्रांताधिकारी बी. आर. माळी आणि तहसीलदार बाळूताई भागवत यांच्या उपस्थितीत हा पाहणी दौरा पार पडला.
दुष्काळामुळे शेतकरी आणि पशुपालकांसमोर निर्माण झालेल्या अडचणींची आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी प्रशासनासमोर मांडणी केली.
दुष्काळग्रस्त भागातील परिस्थिती लक्षात घेऊन तातडीने चारा छावण्या सुरू कराव्यात,
नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे करून शासनाकडून मदत मिळवून द्यावी, अशी मागणी त्यांनी केली.
तसेच ग्रामीण भागातील नागरिकांना रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी रोजगार हमी योजनेची कामे जलदगतीने सुरू करावीत,
पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी योग्य नियोजन करावे, अशा सूचना आमदार देशमुख यांनी प्रशासनाकडे केल्या.
महूद व कटफळ परिसरातील दुष्काळी परिस्थितीची वस्तुस्थिती प्रशासनासमोर मांडत
शेतकरी आणि नागरिकांना त्वरित दिलासा मिळण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याची मागणी आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी यावेळी केली.


0 Comments