Breaking News

वाढेगाव येथे शॉर्टसर्किटने अडीच एकर ऊस जळून खाक; पाच लाखांचे नुकसान

वाढेगाव येथे शॉर्टसर्किटने अडीच एकर ऊस जळून खाक; पाच लाखांचे नुकसान


सांगोला : वाढेगाव (ता. सांगोला) येथे विद्युत वाहिनीच्या तारांमध्ये शॉर्टसर्किट होऊन शेतातील ऊस पिकाला आग लागल्याची घटना गुरुवार (दि. १० सप्टेंबर) रोजी घडली. या आगीत अडीच एकर ऊस पिकासह

 सुमारे ९०० फूट लांबीची पाइपलाइन, विद्युत मोटारीची केबल व पाण्याचे चेंबर्स जळून सुमारे ५ लाख रुपयांचे नुकसान झाल्याची नोंद सांगोला पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. 

याबाबत हर्षवर्धन चव्हाण (वय ३६, व्यवसाय वकील, रा. मस्के कॉलनी नं.४, एखतपूर रोड, सांगोला) यांनी पोलिसांकडे माहिती दिली आहे.

पोलिसात दिलेल्या माहितीनुसार, दि. १० सप्टेंबर रोजी सायंकाळी ४ वाजण्याच्या सुमारास हर्षवर्धन चव्हाण हे पंढरपूर येथे असताना 

त्यांचे आतेभाऊ सुरेश पाटील यांचा फोन आला. आपल्या शेतातील ऊस जळत असल्याचे सांगितल्याने चव्हाण हे तातडीने वाढेगाव येथील शेतात पोहोचले.

त्यावेळी सुरेश पाटील, बाळासाहेब दिघे व सचिन हंबीर हे शेतातील उसाला लागलेली आग विझविण्याचा प्रयत्न करीत होते. चव्हाण यांच्या म्हणण्यानुसार, 

भगत डीपी ते महाकाळ वस्ती या दरम्यानच्या महावितरणच्या विद्युत वाहिनीवरील तारा एकमेकांना चिकटून शॉर्टसर्किट झाल्याने ठिणग्या पडून ऊस पिकाला आग लागल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर आगीत उसाचे पिक मोठ्या प्रमाणात जळाले.

घटनेची माहिती महावितरणच्या कर्मचाऱ्यांना देण्यात आली. तसेच सांगोला येथील कृषी अधिकाऱ्यांनाही लेखी स्वरूपात माहिती देण्यात आल्याचे नमूद करण्यात आले आहे.

 या आगीत अडीच एकर ऊस, सुमारे ९०० फूट पाइपलाइन, विद्युत मोटारीची केबल व पाण्याचे चेंबर्स जळून अंदाजे ५ लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

Post a Comment

0 Comments