गणेश चतुर्थीपूर्वी सांगोल्याची बाजारपेठ भक्तांच्या गर्दीने फुलली !
बाप्पाच्या आगमनासाठी गणेशभक्तांचा उत्साह शिगेला; मूर्ती, पूजासाहित्य व सजावटीच्या वस्तूंच्या खरेदीसाठी बाजारपेठेत मोठी गर्दी
सांगोला (प्रतिनिधी): गणेश चतुर्थी अवघ्या काही तासांवर येऊन ठेपल्याने संपूर्ण सांगोला तालुका भक्तिमय वातावरणात न्हाऊन निघाला आहे.
लाडक्या बाप्पाच्या आगमनासाठी घरोघरी आणि सार्वजनिक गणेश मंडळांमध्ये जय्यत तयारी सुरू असून, बाजारपेठा खरेदीसाठी आलेल्या गणेशभक्तांच्या गर्दीने अक्षरशः ओसंडून वाहत आहेत.
आज सोमवार दि. १४ सप्टेंबर रोजी होणाऱ्या श्रीं च्या प्रतिष्ठापनेसाठी गणेशभक्तांचा उत्साह शिगेला पोहोचला आहे.
सांगोला शहरातील बाजारपेठेमध्ये सध्या चैतन्याचे वातावरण आहे. गणेश मूर्ती, पूजेचे साहित्य, सजावटीच्या वस्तू
आणि नैवेद्यासाठी लागणारे पदार्थ खरेदी करण्यासाठी नागरिकांची झुंबड उडत आहे. शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक,
महात्मा फुले चौक, नेहरु चौक, जयभवानी चौकातील उभारण्यात आलेल्या गणेश मूर्तीच्या स्टॉलवर भक्तांची गर्दी दिसून येत आहे. या स्टॉल्सवर लावण्यात आलेल्या
आरत्या आणि भक्तिगीतांमुळे संपूर्ण वातावरण मंगलमय झाले आहे. अनेक सार्वजनिक मंडळांचे बाप्पाचे आज मंडपामध्ये आगमन होणार असून घरगुती उत्सवासाठीही नागरिकांनी मूर्ती घरी नेण्यास सुरुवात केली आहे.
यंदा पावसाचे सावट कायम असल्याने सार्वजनिक मंडळांनी विशेष काळजी घेत मंडपांची उभारणी केली आहे.
अनेक मंडळांमध्ये देखाव्यांची आणि सजावटीची कामे युद्धपातळीवर सुरू आहेत. मूर्तिकारांची लगबग सुरू असून, नोंदणी केलेल्या मूर्ती वेळेवर देण्यासाठी त्यांची धांदल उडाली आहे.
गणेशोत्सव ही व्यावसायिकांसाठी मोठी पर्वणी असते. उत्सवकाळात बाजारपेठेतील उलाढाल मोठ्या प्रमाणावर वाढते.
आकर्षक साहित्य मांडणी व विविध ऑफर्स ठेवून ग्राहकांना आकर्षित केले जात आहे. उत्सवाच्या पार्श्वभूमीवर व्यावसायिकांनी आपली दुकाने आकर्षक विद्युत रोषणाईने
सजवली आहेत. त्यामुळे गणेश चतुर्थीच्या पूर्वसंध्येला शहरातील बाजारपेठेत विविध रंगी विद्युत रोषणाईचा झगमगाट डोळ्यांचे पारणे फेडत आहे. खरेदीसाठी आलेल्या गणेशभक्तांना गणेशोत्सव सुरू झाल्याची झलक अनुभवायला मिळत आहे.
काल दिवसभर गणेशमूर्ती घेण्यासाठी वाहनांची मोठी वर्दळ दिसून आली. घरगुती व सार्वजनिक पूजेसाठी लागणाऱ्या साहित्याची जमवाजमव करण्यासाठी भाविकांची धावपळ सुरू होती.
किराणा, कपडे, भाजीपाला, फळे, सजावटीच्या वस्तू आणि पूजाविधीच्या साहित्यामुळे बाजारपेठेतील रस्त्यांवर मोठी गर्दी उसळली. त्यामुळे अनेकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला,
मात्र ग्रामीण भागात गणेशोत्सव हा सण नेहमीप्रमाणेच जल्लोषात आणि कौटुंबिक वातावरणात साजरा करण्यासाठी नागरिकांनी उत्साहाने खरेदी केली.
महागाईमुळे सर्वच वस्तूंच्या किमती वाढल्या असल्या तरी खरेदीत नागरिकांनी कोणतीही कसर ठेवली नाही. गणेशमूर्तीच्या किमती १५ ते २० टक्क्यांनी वाढल्या असून गणपती बाप्पा घरी येत
असल्याने भाविक खरेदीत उत्साह दाखवत आहेत. महागाई असूनही दुकानात मोठी गर्दी व उत्साह दिसून येत आहे.


0 Comments