सांगोला शहर मोकाट जनावरांच्या विळख्यात! रस्त्यावर जनावरे, कुत्री अन् गाढवांचा सुळसुळाट; नागरिकांच्या जीविताला धोका, प्रशासनाचे दुर्लक्ष
सांगोला : सांगोला शहरातील प्रमुख रस्ते, बाजारपेठा, चौक आणि वर्दळीच्या परिसरात मोकाट जनावरे, कुत्री व गाढवांचा मुक्त वावर वाढला असून,
नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. रस्त्याच्या मधोमध ठाण मांडून बसलेली जनावरे आणि अचानक वाहनांसमोर येणारी कुत्री यामुळे वाहनचालकांची चांगलीच तारांबळ उडत आहे.
शहरातील अनेक भागांत मोकाट जनावरे रस्त्यावरच फिरताना अथवा रस्त्याच्या कडेला बसलेली दिसून येतात. त्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होण्याबरोबरच अपघाताचा धोका वाढला आहे. विशेषतः दुचाकीस्वार, ज्येष्ठ नागरिक आणि शाळकरी विद्यार्थ्यांना याचा मोठा फटका बसत आहे.
कुत्र्यांच्या टोळ्यांचा वाढता वावर
शहरातील विविध भागांत मोकाट कुत्र्यांच्या टोळ्या फिरताना दिसत आहेत. रात्रीच्या वेळी या कुत्र्यांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होत
असून, दुचाकीस्वारांच्या मागे धावण्याच्या घटनांमुळे अपघात होण्याची शक्यता आहे. कुत्र्यांच्या वाढत्या संख्येवर प्रभावी उपाययोजना करण्याची गरज निर्माण झाली आहे.
गाढवांचा मुक्त संचार; वाहतुकीलाही अडथळा
शहरातील काही रस्त्यांवर गाढवांचा मोकाट वावरही वाढला आहे. रस्त्यावर अचानक गाढवे आल्याने वाहनचालकांना वाहने नियंत्रित करणे कठीण जात आहे. त्यामुळे मोठा अपघात होण्यापूर्वी प्रशासनाने या प्रश्नाकडे गांभीर्याने पाहणे आवश्यक आहे.
प्रशासन नेमके करणार तरी काय?
शहरातील स्वच्छता, वाहतूक आणि नागरिकांच्या सुरक्षिततेशी संबंधित हा गंभीर प्रश्न असूनही मोकाट जनावरांवर ठोस कारवाई होताना दिसत नाही. केवळ एखाद्या दुर्घटनेनंतर प्रशासन जागे होण्याची वाट पाहणार का, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
मोकाट जनावरांचा बंदोबस्त करण्यासाठी संबंधित पशुमालकांवर कारवाई, जनावरांना सुरक्षित ठिकाणी हलविण्याची व्यवस्था, मोकाट कुत्र्यांबाबत आवश्यक उपाययोजना तसेच गाढवांच्या मालकांवर जबाबदारी निश्चित करण्याची मागणी नागरिकांतून होत आहे.
अपघात घडल्यानंतर उपाययोजना करण्यापेक्षा त्याआधीच प्रशासनाने जागे होणे गरजेचे आहे. सांगोला शहरातील मोकाट जनावरांचा प्रश्न तातडीने मार्गी लावून नागरिकांना सुरक्षित रस्ते उपलब्ध करून द्यावेत, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे.



0 Comments