सांगोला येथील जुना मेडशिंगी रोड परिसर बनला अपघाताचा हॉटस्पॉट ; विद्यार्थी, नागरिक अन् वाहनधारकांचा जीव टांगणीला
सांगोला शहरातून जाणाऱ्या जुना मेडशिंगी रोड परिसराला सध्या भीषण वाहतूक कोंडी आणि वाढत्या अपघातांचे ग्रहण लागले असून, हा संपूर्ण परिसर जणू काही धोकादायक अपघातग्रस्त क्षेत्र बनला आहे.
या महत्त्वाच्या मार्गावर गीता बनकर अध्यापक विद्यालय आणि उत्कर्ष माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय यांसारख्या नामांकित शैक्षणिक संस्थांबरोबरच स्पंदन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल, मातोश्री नगर व श्री स्वामी समर्थ नगर या दाट लोकवस्तीच्या निवासी वसाहती आहेत.
त्यामुळे दिवसभरात हजारो विद्यार्थी, चिंताक्रांत पालक, रुग्ण, त्यांचे नातेवाईक आणि स्थानिक नागरिकांची या रस्त्यावर प्रचंड वर्दळ असते. मात्र, नियोजनशून्य कारभार, अपूर्ण विकासकामे आणि शिस्तीचा पूर्णपणे अभाव यामुळे या मार्गावरून प्रवास करणे
म्हणजे रोज जीवावर उदार होऊन प्रवास करण्यासारखे झाले असून, प्रशासन यावर कधी योग्य मार्ग काढणार, असा संतप्त सवाल नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे.
या संपूर्ण परिसरातील रस्ते आधीच अत्यंत अरुंद असताना त्यात प्रशासकीय नियोजनशून्यतेची भर पडली आहे. सध्या या भागात भुयारी रस्त्याचे काम सुरू असून, त्यानिमित्ताने रस्ते ठिकठिकाणी अर्धवट खणलेल्या अवस्थेत सोडून देण्यात आले आहेत.
रस्त्याच्या दुरवस्थेमुळे आणि अरुंद मार्गामुळे वाहनांना जाण्यासाठी अतिशय कमी जागा उरते. त्यातच रस्त्याच्या अगदी मधोमध उंच आलेले आणि धोकादायक ठरत असलेले लोखंडी चेंबर्स वाहनधारकांसाठी उघडे मृत्यूचे सापळे बनले आहेत.
रात्रीच्या वेळी किंवा वाहतुकीच्या गर्दीत हे उंच चेंबर्स व उघडे खड्डे न दिसल्यामुळे अनेक दुचाकीस्वार घसरून पडत असून, गाड्यांचेही मोठे नुकसान होत आहे.
त्यातच भर म्हणून या अरुंद रस्त्यालगतच मोठमोठे किराणा मॉल, खाजगी पाणी विक्री केंद्र आणि डाळिंब खरेदीची दुकाने थाटली गेली आहेत. या दुकानांमध्ये येणारे ग्राहक आणि व्यापारी आपली चारचाकी व मालवाहू वाहने मुख्य रस्त्यातच आडवी-तिडवी पार्क करतात.
त्यातच भरधाव वेगाने दुचाकी पळवणारा हुल्लडबाज तरुण वर्ग आणि बेफाम वाहने चालवणारे चालक यामुळे या भागातील पादचारी व इतर वाहनधारकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न अतिशय गंभीर बनला आहे.
रस्त्यात उभ्या केलेल्या या वाहनांमुळे आणि अर्धवट खणलेल्या रस्त्यांमुळे श्री स्वामी समर्थ नगर व मातोश्री नगर भागातून मुख्य रस्त्यावर ये-जा करणाऱ्या नागरिकांना समोरून येणाऱ्या वाहनांचा अंदाजच येत नाही, परिणामी येथे दररोज लहान-मोठे अपघात घडत आहेत.
शैक्षणिक संस्थांचे केंद्र असलेल्या या भागात दररोज सकाळी आणि दुपारी शाळा-महाविद्यालयांच्या बस, व्हॅन आणि रिक्षा यांची मोठी गर्दी असते. अशा वेळी या अरुंद, खड्ड्यांनी भरलेल्या रस्त्यावरून आणि वाहतूक कोंडीतून मार्ग काढताना लहान मुलांचे व पालकांचे प्रचंड हाल होतात.
त्यातच भर म्हणजे रस्त्यावर ठिकठिकाणी ठिय्या मांडून बसणारी मोकाट जनावरे आणि भटक्या कुत्र्यांचा वावर यामुळे वाहनधारकांची पुरती तारांबळ उडते. अनेकदा ही मोकाट जनावरे किंवा कुत्री अचानक वाहनांसमोर आल्याने दुचाकीस्वारांचे भीषण अपघात झाले आहेत.
रुग्णालयात जाणाऱ्या रुग्णवाहिकांनाही या खड्डेमय रस्त्यात आणि कोंडीत अडकून राहावे लागत असल्याने रुग्णांचा जीव धोक्यात येत आहे.
एकीकडे रुग्ण, दुसरीकडे शालेय विद्यार्थी आणि दुसरीकडे स्थानिक रहिवासी अशा सर्वांचाच जीव या अर्धवट रस्त्यांमुळे आणि अपघातांच्या मालिकेमुळे टांगणीला लागला आहे. भुयारी रस्त्याचे काम तातडीने पूर्ण करणे,
रस्त्यामधील लोखंडी चेंबर्सची पातळी रस्त्याशी समान करणे, रस्त्यावरील अतिक्रमणे हटवून बेकायदेशीर पार्किंगवर दंडात्मक कारवाई करणे आणि मोकाट जनावरांचा बंदोबस्त करणे
अत्यंत गरजेचे झाले आहे. सतत अपघातांच्या छायेत असलेल्या या जुना मेडशिंगी रोड परिसराला आणि स्पंदन हॉस्पिटल ते शाळा दरम्यानच्या धोकादायक पट्ट्याला शिस्त लावण्यासाठी संबंधित
नगरपालिका, पोलीस प्रशासन आणि सार्वजनिक बांधकाम विभाग तातडीने कठोर पावले उचलून योग्य तो मार्ग काढतील का, की एखाद्या मोठ्या दुर्घटनेची वाट पाहणार, असा थेट आणि संतप्त सवाल आता सांगोलकर नागरिक विचारत आहेत.



0 Comments