Breaking News

शहाजीबापूंची भीष्मप्रतिज्ञा; ‘पराभवाचा हिशेब चुकता केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही’

शहाजीबापूंची भीष्मप्रतिज्ञा; ‘पराभवाचा हिशेब चुकता केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही’


सांगोला : विधानसभा निवडणुकीतील पराभव माजी आमदार शहाजीबापू पाटील यांच्या मनावर खोलवर परिणाम करून गेला असल्याचे त्यांच्या अलीकडील वक्तव्यांवरून दिसून येत आहे. 

राज्यसभा किंवा विधान परिषदेत जाण्याची संधी पक्षाकडून मिळाली तरी ती स्वीकारणार नसल्याचे स्पष्ट करत, आगामी काळात पुन्हा मैदानात उतरून राजकीय संघर्ष करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे.

“निवडणुकीतील हार-जीत होतच असते. माझ्यासारखा निवडणुकीतील पराभवाचा अनुभव कदाचित कोणालाच नसेल. मात्र, मी लढवय्या माणूस आहे. 

ज्या व्यक्तीमुळे मला पराभवाचा सामना करावा लागला, त्याचा पराभव केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही,” असा ठाम निर्धार शहाजीबापूंनी व्यक्त केला.

विधानसभा निवडणुकीनंतर शहाजीबापू पाटील सातत्याने आपल्या पराभवाचे राजकीय विश्लेषण करताना दिसत आहेत. 

आपल्या पराभवामागे माजी आमदार दीपकआबा साळुंखे हे प्रमुख कारण असल्याचा आरोप ते वारंवार करत आहेत. त्यामुळे गेल्या काही दिवसांत दोन्ही नेत्यांमधील राजकीय संघर्ष अधिक तीव्र झाल्याचे चित्र आहे.

शहाजीबापूंकडून दीपकआबांवर जोरदार टीका होत असताना दीपकआबांकडूनही त्याला तितक्याच आक्रमकपणे प्रत्युत्तर दिले जात आहे. त्यामुळे सांगोला तालुक्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.

दरम्यान, शहाजीबापूंच्या ताज्या वक्तव्यामुळे आगामी २०२९ ची विधानसभा निवडणूक आतापासूनच चर्चेच्या केंद्रस्थानी आली आहे. दोन्ही नेत्यांमधील राजकीय संघर्ष भविष्यात कोणते वळण घेतो 

आणि २०२९ मध्ये पुन्हा एकदा हे दोन राजकीय दिग्गज आमनेसामने येतात का, याकडे सांगोल्याच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

Post a Comment

0 Comments