सांगोल्यात शिवसेना शिंदे गटाचा शक्तिप्रदर्शन मेळावा; भरतशेट गोगावले, योगेश कदमांसह दिग्गज नेते येणार
शहाजीबापू पाटील यांच्या नेतृत्वाखाली संघटन बळकट; विविध पक्षांतील कार्यकर्त्यांच्या प्रवेशाची शक्यता
सांगोला / प्रतिनिधी : सांगोला विधानसभा मतदारसंघात शिवसेना (शिंदे गट) आपली संघटनात्मक ताकद आणखी मजबूत करण्याच्या तयारीत असून, ४ सप्टेंबर रोजी दुपारी २ वाजता रामकृष्ण विला, सांगोला येथे शिवसेना व युवासेनेचा भव्य मेळावा आयोजित करण्यात आला आहे.
या मेळाव्यास राज्यातील अनेक मान्यवर नेते उपस्थित राहणार असल्याने सांगोल्याच्या राजकीय वर्तुळात उत्सुकता निर्माण झाली आहे.
या मेळाव्यास राज्याचे रोजगार हमी, फलोत्पादन व खारभूमी विकास मंत्री तथा
रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री भरतशेट गोगावले आणि राज्यमंत्री योगेश कदम यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. तसेच खासदार ज्योतीताई वाघमारे, खासदार धैर्यशील माने, माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे, माढा लोकसभा संपर्क प्रमुख चंद्रहारदादा पाटील तसेच
शिवसेना उपनेत्या दिपाली सय्यद आदी मान्यवर मेळाव्यास उपस्थित राहून कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार असल्याची माहिती माजी आमदार ॲड. शहाजीबापू पाटील यांनी दिली.
शहाजीबापूंच्या नेतृत्वाखाली संघटन विस्तार
सांगोला विधानसभा मतदारसंघात माजी आमदार शहाजीबापू पाटील यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना शिंदे गटाची संघटनात्मक ताकद वाढत असल्याचे चित्र आहे. सांगोला नगरपरिषदेत शिवसेनेचे लोकनियुक्त नगराध्यक्ष आनंद माने यांच्या नेतृत्वाखाली
शिवसेनेची सत्ता असून, ग्रामीण भागातही पक्षाचे जाळे मजबूत करण्यावर भर दिला जात आहे.
शिवसेना, युवासेना, सोशल मीडिया तसेच विविध सेलच्या माध्यमातून तालुक्यात पक्ष संघटना अधिक सक्रिय करण्यात येत आहे.
शहाजीबापू पाटील यांच्या कार्यपद्धतीवर विश्वास ठेवून यापूर्वी विविध पक्षांतील शेकडो कार्यकर्त्यांनी मुंबई येथे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला होता.
४ सप्टेंबरच्या मेळाव्यातही पक्षप्रवेश
आगामी मेळाव्यात विविध पक्षांतील अनेक कार्यकर्ते शिवसेनेत प्रवेश करण्याची शक्यता असून, मान्यवर नेत्यांच्या उपस्थितीत त्यांचा पक्षप्रवेश होणार आहे.
त्यामुळे हा मेळावा केवळ कार्यकर्ता मेळावा न राहता शिवसेनेच्या शक्तिप्रदर्शनाचा मोठा कार्यक्रम ठरण्याची चर्चा आहे.
मेळाव्याच्या तयारीसाठी तालुक्यातील शिवसेना व युवासेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते जोमाने कामाला लागले आहेत.
सांगोला शहरात भगवे झेंडे, बॅनर आणि स्वागत फलकांमुळे उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, मेळाव्यास मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित राहतील, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
चौकट : ‘अनेकांचा शिवसेनेत प्रवेश होणार’
सांगोला तालुक्यात शिवसेना शिंदे गटाची ताकद सातत्याने वाढत असून, माजी आमदार शहाजीबापू पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून शेकापसह विविध पक्षांतील शेकडो कार्यकर्त्यांनी यापूर्वी शिवसेनेत प्रवेश केला आहे.
४ सप्टेंबर रोजी होणाऱ्या भव्य मेळाव्यातही अनेक कार्यकर्ते शिवसेनेत प्रवेश करतील, अशी माहिती शिवसेना तालुकाप्रमुख तथा जि. प. सदस्य दादासाहेब लवटे यांनी दिली.


0 Comments