जरांगे पाटील यांच्या खालावलेल्या प्रकृतीने शहाजीबापू भावूक; आंतरवालीत भेट घेऊन थेट मंत्र्यांशी साधला संपर्क
मराठा आरक्षणाच्या लढ्याला पाठिंबा; शंभूराजे देसाई यांच्याशी दूरध्वनीवरून केली चर्चा
सांगोला / प्रतिनिधी : मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी आंतरवाली सराटी, जि. जालना येथे सुरू असलेल्या आंदोलनाचे नेतृत्व करणारे संघर्षयोद्धा मनोजदादा जरांगे पाटील यांची
सांगोल्याचे माजी आमदार शहाजीबापू पाटील यांनी मंगळवार, दि. १ रोजी भेट घेतली. उपोषणामुळे जरांगे पाटील यांची प्रकृती खालावलेली पाहून शहाजीबापू पाटील भावूक झाल्याचे चित्र यावेळी पाहायला मिळाले.
आंतरवाली सराटी येथील उपोषणस्थळी पोहोचल्यानंतर शहाजीबापू पाटील यांनी मनोजदादा जरांगे पाटील यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. तसेच सुरू असलेल्या आंदोलनाची आणि मराठा समाजाच्या प्रमुख मागण्यांची सविस्तर माहिती घेतली.
जरांगे पाटील यांच्या प्रकृतीबाबत चिंता व्यक्त करत शहाजीबापू पाटील यांनी तातडीने राज्याचे मंत्री शंभूराजे देसाई यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधला.
आंदोलनाची गंभीरता, मराठा समाजाच्या भावना आणि जरांगे पाटील यांच्या प्रकृतीची माहिती त्यांनी मंत्र्यांना दिली. शासनाने या प्रश्नाकडे गांभीर्याने पाहून तातडीने सकारात्मक तोडगा काढावा, अशी विनंतीही त्यांनी केली.
यावेळी उपस्थित मराठा समाजातील पदाधिकारी आणि आंदोलकांशी संवाद साधताना शहाजीबापू पाटील म्हणाले की, मराठा समाजाच्या भावना अत्यंत तीव्र असून शासनाने या मागण्यांकडे संवेदनशीलतेने आणि गांभीर्याने पाहणे आवश्यक आहे.
मनोजदादा जरांगे पाटील यांनी समाजासाठी सुरू केलेला संघर्ष महत्त्वाचा आहे. मात्र, त्यांच्या प्रकृतीची काळजी घेणेही तितकेच गरजेचे आहे.
मनोजदादा जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या मराठा आरक्षण आंदोलनाकडे राज्यभराचे लक्ष लागले आहे. आरक्षणाचा प्रश्न लवकर मार्गी लागावा,
अशी अपेक्षा मराठा समाजातून व्यक्त होत आहे. विविध सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील मान्यवरही उपोषणस्थळी भेट देऊन आंदोलनाला पाठिंबा देत आहेत.
या भेटीप्रसंगी शहाजीबापू पाटील यांच्यासोबत दिपक उर्फ गुंडादादा खटकाळे, योगेशदादा खटकाळे, नवनाथआबा खटकाळे, विजय (बबलू) इंगोले, सचिन काशीद, अवधूत इंगोले आणि अभिजित नलवडे उपस्थित होते.
शहाजीबापू पाटील यांच्या भेटीमुळे उपोषणस्थळी उपस्थित कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर शासनाने तातडीने निर्णय घ्यावा,
तसेच मनोजदादा जरांगे पाटील यांच्या प्रकृतीचा विचार करून सरकारने संवादातून हा प्रश्न सोडवावा, अशी मागणी आंदोलकांकडून करण्यात आली.
दरम्यान, जरांगे पाटील यांच्या प्रकृतीबाबत वाढत असलेली चिंता आणि सुरू असलेल्या आंदोलनाची तीव्रता पाहता, पुढील घडामोडींकडे आता संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.


0 Comments