सोनंदच्या नदीपात्रात अवैध वाळू उपसा; ४ लाख १६ हजारांचा मुद्देमाल जप्त टेम्पोसह वाळू पोलिसांच्या ताब्यात; ट्रॅक्टर चालक पसार, योगेश बाबर व शिवराज बोराडे यांच्याविरुद्ध कारवाई
सांगोला : सोनंद (ता. सांगोला) येथील जिल्हा परिषद शाळेच्या पाठीमागील नदीपात्रातून विनापरवाना वाळूचा उपसा करून वाहतूक होत
असल्याची माहिती मिळाल्यानंतर सांगोला पोलिसांनी शनिवारी (दि. २९) दुपारी कारवाई केली. या कारवाईत वाळूने भरलेला टेम्पो ताब्यात घेण्यात आला
असून, पोलिसांना पाहून वाळूने भरलेला लाल रंगाचा ट्रॅक्टर घटनास्थळावरून पसार झाला. वाहनांसह अंदाजे ४ लाख १६ हजार रुपयांचा मुद्देमाल या कारवाईत असल्याचे पोलिसांनी सांगितले.
सांगोला पोलीस ठाण्याचे पोलीस कॉन्स्टेबल रविंद्र नानकसिंग साबळे यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. पोलिसांना दि. २९ ऑगस्ट रोजी दुपारी सुमारे अडीच वाजण्याच्या सुमारास सोनंद येथील
नदीपात्रात वाळूचा उपसा करून वाहतूक सुरू असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पोलीस उपनिरीक्षक राऊत, पोलीस हवालदार शेख, पोलीस नाईक नलवडे तसेच पोलीस कर्मचारी कांबळे, मासाळ व शिंदे यांच्या पथकाने सोनंद गाठले.
जिल्हा परिषद शाळेजवळ वाहने उभी करून पोलीस नदीपात्राच्या दिशेने पायी जात असताना एक लाल रंगाचा ट्रॅक्टर वाळू भरून येताना दिसला. पोलिसांनी थांबण्याचा इशारा करूनही चालकाने ट्रॅक्टर न थांबवता तेथून पळ काढल्याचे फिर्यादीत नमूद आहे.
दरम्यान, ट्रॅक्टरच्या पाठोपाठ एक पिवळसर-हिरवट रंगाचा टाटा कंपनीचा टेम्पो वाळू भरून येताना दिसला. पोलिसांनी टेम्पो अडवून तपासणी केली. टेम्पो चालक अल्पवयीन असल्याचे समोर आले. त्याची ओळख कायद्यानुसार जाहीर करण्यात आलेली नाही.
चौकशीदरम्यान टेम्पो मालक योगेश बाबर, रा. सोनंद यांच्या सांगण्यावरून नदीपात्रातून वाळू भरून गावातील मशिदीजवळ टाकण्यासाठी जात असल्याचे सांगितल्याचे पोलिसांच्या फिर्यादीत नमूद आहे. तसेच सदर वाळू वाहतुकीसाठी कोणताही पास अथवा परवाना नसल्याचेही सांगण्यात आले.
पसार झालेल्या ट्रॅक्टरबाबत चौकशी केली असता त्यावर चालक म्हणून शिवराज महिपती बोराडे, रा. सोनंद, ता. सांगोला हा असल्याचे सांगण्यात आल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे.
वाहनांसह वाळू जप्त
पोलिसांनी KL 09 P 4120 क्रमांकाचा टाटा कंपनीचा टेम्पो ताब्यात घेतला असून त्याची अंदाजे किंमत १ लाख ५८ हजार रुपये आहे. टेम्पोमध्ये अंदाजे एक ब्रास वाळू आढळून आली.
तर घटनास्थळावरून पसार झालेल्या लाल रंगाच्या विनानंबर ट्रॅक्टरची अंदाजे किंमत २ लाख ५८ हजार रुपये असून, त्याच्या ट्रॉलीमध्येही अंदाजे एक ब्रास वाळू असल्याचे फिर्यादीत नमूद आहे. अशा प्रकारे वाहनांसह एकूण ४ लाख १६ हजार रुपयांचा मुद्देमाल असल्याचे सांगण्यात आले आहे.
वाळू तस्करीच्या साखळीचा तपास होणार?
सोनंदच्या नदीपात्रातून वाळू कोणाच्या सांगण्यावरून उपसली जात होती, वाळूचा पुरवठा कुठे केला जाणार होता, तसेच या प्रकरणामागे आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा तपास पोलिसांकडून केला जात आहे.
या प्रकरणी योगेश बाबर, शिवराज महिपती बोराडे आणि संबंधित अल्पवयीन चालकाविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०३(२), ३०५(ई) व ३(५) अन्वये कायदेशीर कारवाईची फिर्याद देण्यात आली आहे.
दरम्यान, नदीपात्रातून होणाऱ्या अवैध वाळू उपशामुळे पर्यावरणासह शासनाच्या महसुलाचे नुकसान होत असल्याने अशा प्रकारच्या कारवायांना आळा घालण्यासाठी प्रशासनाने अधिक कठोर भूमिका घेण्याची गरज व्यक्त होत आहे.


0 Comments