सांगोल्यात प्रतिबंधित गुटखा व सुगंधित तंबाखूवर कारवाई; १ लाख ३ हजार ६२२ रुपयांचा मुद्देमाल जप्त
सांगोला / प्रतिनिधी : सांगोला शहरात प्रतिबंधित अन्नपदार्थांची विक्री होत असल्याच्या माहितीवरून अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी कारवाई करत एका ठिकाणी छापा टाकला.
या कारवाईत महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला गुटखा, सुगंधित तंबाखू व इतर प्रतिबंधित पदार्थांचा मोठा साठा जप्त करण्यात आला असून, एकूण १ लाख ३ हजार ६२२ रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
याबाबत अन्न सुरक्षा अधिकारी गणेश महादेव कदम (वय ४०) यांनी सांगोला पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी हे अन्न व औषध प्रशासन, राज्य सोलापूर कार्यालयात अन्न सुरक्षा अधिकारी म्हणून कार्यरत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना सांगोला शहरातील एका ठिकाणी महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेल्या अन्नपदार्थांचा साठा करून विक्री केली जात असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार संबंधित ठिकाणी कारवाई करण्यात आली.
या कारवाईत विविध प्रकारचा प्रतिबंधित गुटखा, सुगंधित तंबाखू व तत्सम पदार्थांचा साठा आढळून आला. जप्त केलेल्या मुद्देमालामध्ये विविध ब्रँडच्या तंबाखूजन्य पदार्थांचा समावेश असून त्याची किंमत १,०३,६२२ रुपये इतकी असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
या प्रकरणात संबंधितांवर अन्न सुरक्षा व मानके अधिनियम, २००६ तसेच Food Products Standards and Food Additives Regulations, 2011 मधील संबंधित तरतुदीनुसार कारवाई करण्यात आली आहे.
सांगोला पोलिस ठाण्यात या प्रकरणाची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.


0 Comments