Breaking News

६६ लाखांचे सोने घेऊन बारावीचा विद्यार्थी पसार; पनवेल पोलिसांनी ४८ तासांत सांगोल्यातून घेतले ताब्यात

६६ लाखांचे सोने घेऊन बारावीचा विद्यार्थी पसार; पनवेल पोलिसांनी ४८ तासांत सांगोल्यातून घेतले ताब्यात


पनवेल : झटपट पैसा कमावून ऐषआरामी जीवन जगण्याच्या मोहापायी बारावीत शिकणाऱ्या एका अल्पवयीन विद्यार्थ्याने तब्बल ६६ लाख ६२ हजार ३०० रुपये किमतीचे सोने घेऊन पलायन केल्याची घटना पनवेलमध्ये घडली. 

विशेष म्हणजे, पनवेल शहर पोलिसांनी तांत्रिक तपास आणि सीसीटीव्हीच्या आधारे अवघ्या ४८ तासांत या विद्यार्थ्याचा माग काढत सांगोला तालुक्यातील खिलारवाडी येथून त्याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून चोरी केलेल्या सोन्याच्या सहाही लगडी पोलिसांनी हस्तगत केल्या.

पनवेल शहरातील स्वरूप रिफायनरी ज्वेलर्स येथे ही घटना घडली. सोन्याची शुद्धता तपासण्यासाठी फिर्यादींनी संबंधित विद्यार्थ्याकडे सहा सोन्याच्या लगडी विश्वासाने दिल्या होत्या. या सोन्याचे एकूण वजन ६६६.२३ ग्रॅम असून बाजारमूल्य ६६ लाख ६२ हजार ३०० रुपये होते.

मात्र, एवढ्या मोठ्या किमतीचे सोने पाहून विद्यार्थ्याच्या मनात वेगळाच विचार आला. कमी वेळेत मोठा पैसा मिळवून श्रीमंत होण्याच्या इच्छेतून त्याने विश्वासाचा गैरफायदा घेत सहाही सोन्याच्या लगडी घेऊन तेथून पलायन केले.

या प्रकरणी २१ ऑगस्ट २०२६ रोजी पनवेल शहर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता, २०२३ मधील कलम ३१६ (४) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. 

गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळा कुंभार यांच्या नेतृत्वाखाली तपासाची चक्रे वेगाने फिरवण्यात आली.

पोलिसांनी पनवेल शहरासह रेल्वे स्थानक परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्याचबरोबर तांत्रिक तपासाच्या माध्यमातून विद्यार्थ्याच्या हालचालींचा माग काढण्यात आला. तपासात तो रेल्वेने सोलापूर जिल्ह्यातील कुर्डूवाडी येथे उतरल्याचे समोर आले.

यानंतर पोलिसांनी त्याचा माग काढत सांगोला तालुक्यातील खिलारवाडी या मूळ गावी धाव घेतली. तेथे सापळा रचून पोलिसांनी अल्पवयीन विद्यार्थ्याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून ६६६.२३ ग्रॅम वजनाच्या सोन्याच्या सहाही लगडी जप्त करण्यात आल्या.

या कारवाईमुळे ६६ लाखांहून अधिक किमतीचे सोने अवघ्या दोन दिवसांत परत मिळवण्यात पनवेल शहर पोलिसांना यश आले. 

या प्रकरणातील तपास पुढे सुरू असून विद्यार्थ्याने हा प्रकार नेमका कोणत्या उद्देशाने केला आणि त्यामागे आणखी कोणी सहभागी आहे का, याचाही तपास केला जात आहे.

ही कारवाई पोलीस उपायुक्त परिमंडळ-३ रश्मी नांदेडकर आणि सहायक पोलीस आयुक्त, पनवेल विभाग मधुर भुजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळा कुंभार, पोलीस निरीक्षक (गुन्हे) शाकीर पटेल, पोलीस निरीक्षक (प्रशासन) अभिजीत अभंग,

 पोलीस उपनिरीक्षक हजरत पठाण, किरण राऊत, तसेच पोलीस हवालदार योगेश दिवेकर, अविनाश गंथडे, अमोल पाटील, संदेश म्हात्रे आणि गुन्हे प्रकटीकरण पथकातील अधिकारी व अंमलदारांनी या कारवाईत सहभाग घेतला.

Post a Comment

0 Comments