सांगोला सेतू कार्यालयाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह; विद्यार्थ्यांच्या दाखल्यांना विलंबाचा फटका?
सांगोला | प्रतिनिधी सांगोला तहसील कार्यालयाच्या अंतर्गत कार्यरत असलेल्या सेतू कार्यालयातील दाखले
वितरण आणि विविध शासकीय सेवांच्या कामकाजाबाबत नागरिकांमध्ये नाराजी वाढत असल्याच्या तक्रारी समोर येत आहेत.
शासनाने निश्चित केलेल्या शुल्क व नियमांनुसार सेवा मिळत नसल्याचा आरोप काही नागरिकांनी केला असून, या प्रकारामुळे विद्यार्थी,
शेतकरी आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे सांगितले जात आहे.
नागरिकांच्या तक्रारीनुसार, काही दाखले अतिरिक्त पैसे देऊन तातडीने मिळत असल्याचा आरोप केला जात आहे. दुसरीकडे नियमित प्रक्रियेत अर्ज करणाऱ्या नागरिकांना मात्र दाखले मिळण्यासाठी
अनेक दिवस प्रतीक्षा करावी लागत असल्याचे सांगितले जाते. अर्जामध्ये वारंवार त्रुटी दाखविणे,
अर्ज प्रलंबित ठेवणे तसेच काही दाखल्यांसाठी १५ दिवसांपर्यंत विलंब होत असल्याच्या तक्रारीही करण्यात आल्या आहेत.
या विलंबाचा सर्वाधिक परिणाम विद्यार्थ्यांवर होण्याची शक्यता आहे. महाविद्यालयीन प्रवेश, शिष्यवृत्ती तसेच विविध शैक्षणिक आणि शासकीय योजनांसाठी उत्पन्न,
रहिवासी व अन्य आवश्यक दाखले वेळेत सादर करणे गरजेचे असते. त्यामुळे दाखले मिळण्यास विलंब झाल्यास विद्यार्थ्यांना संधी गमावण्याची वेळ येऊ शकते, अशी चिंता पालकांकडून व्यक्त होत आहे.
दरम्यान, सेतू कार्यालयातील कथित अनियमिततेला तहसील
कार्यालयातील काही अधिकारी व कर्मचाऱ्यांचे पाठबळ असल्याची चर्चा नागरिकांमध्ये असल्याचेही सांगितले जात आहे.
मात्र या आरोपांची अद्याप अधिकृत पुष्टी झालेली नाही. त्यामुळे प्रशासनाने या संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून वस्तुस्थिती जनतेसमोर आणावी, अशी मागणी होत आहे.
शासकीय सेतू कार्यालयातील सेवा शासनाच्या नियमांनुसार आणि निर्धारित शुल्कातच उपलब्ध व्हाव्यात, यासाठी स्पष्ट दरपत्रक व
सेवा कालमर्यादा नागरिकांना सहज दिसेल अशा ठिकाणी लावण्यात यावी. तसेच अर्जाची स्थिती तपासण्यासाठी पारदर्शक व्यवस्था उपलब्ध करून देण्याची मागणीही होत आहे.
विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी प्रशासन तातडीने लक्ष देणार का? तक्रारींची चौकशी करून दोषी आढळणाऱ्यांवर कारवाई होणार का?
तसेच सेतू कार्यालयातील कामकाज अधिक पारदर्शक करण्यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधी कोणती भूमिका घेणार, याकडे आता सांगोला तालुक्यातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.


0 Comments