Breaking News

बनावट कागदपत्रांचा आधार घेत अल्पवयीन मुलीचे लग्न; २ लाखांच्या व्यवहाराचा आरोप, सांगोला तालुक्यातील मानेगावातील तरुणाचे नाव समोर

बनावट कागदपत्रांचा आधार घेत अल्पवयीन मुलीचे लग्न; २ लाखांच्या व्यवहाराचा आरोप, सांगोला तालुक्यातील मानेगावातील तरुणाचे नाव समोर


सांगोला : नाशिक आणि सोलापूर पोलिसांच्या संयुक्त तपासातून अल्पवयीन मुलींचे बनावट कागदपत्रांच्या आधारे लग्न लावून देणाऱ्या कथित रॅकेटचा प्रकार समोर आला आहे. 

या प्रकरणात १७ वर्षे ८ महिने वयाच्या मुलीचे सांगोला तालुक्यातील मानेगाव येथील अमोल दादा कदम याच्याशी लग्न लावून दिल्याचा आरोप असून, मध्यस्थांनी या व्यवहारातून सुमारे २ लाख रुपये घेतल्याचे पोलिसांच्या तक्रारीत नमूद आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, छत्रपती संभाजीनगर येथील ही अल्पवयीन मुलगी आपल्या आईसोबत नाशिक येथे देवदर्शनासाठी आली होती.

 त्यावेळी तिच्या आईची ओळख माधव कारभारी वाघ याच्याशी झाली. मुलीच्या आईला २५ ते ३० हजार रुपयांचे आमिष दाखवून मुलीला काही काळासाठी सोबत पाठवण्यास सांगितल्याचा आरोप आहे.

यानंतर माधव वाघ याने साथीदारांच्या मदतीने मुलीची खोटी ओळख तयार केल्याचा आरोप आहे. अंजना राजेंद्र देवरे हिला मुलीची खोटी आई, तर राहुल गया शेळके याला खोटा मामा म्हणून उभे करण्यात आल्याचे पोलिसांच्या तक्रारीत नमूद आहे

मुलीचे नाव बदलून ‘मरीना देवरे’ असे दाखवण्यात आले. तसेच बनावट स्टॅम्प पेपर, आधार कार्ड आणि इतर कागदपत्रांचा वापर करून विवाहाची प्रक्रिया पार पाडण्यात आल्याचा आरोप आहे.

यानंतर मुलीचे लग्न सांगोला तालुक्यातील मानेगाव येथील अमोल दादा कदम याच्यासोबत ठरवण्यात आले. मध्यस्थांच्या माध्यमातून अमोल कदम व त्याच्या नातेवाईकांकडून तब्बल २ लाख रुपये घेतल्याचा आरोप असून, त्यानंतर मुलीला मानेगाव येथे पाठवण्यात आले.

मानेगाव येथे पोहोचल्यानंतर मुलीला संपूर्ण प्रकाराची जाणीव झाली. तिने आपल्या खऱ्या आईशी संपर्क साधून घडलेली घटना सांगितली. आपण १८ वर्षांखालील असल्याचे सांगत तिने या लग्नास नकार दिला.

प्रकरणाचे गांभीर्य लक्षात आल्यानंतर कदम कुटुंबीयांनी पोलिसांची मदत घेतली. त्यानंतर मुलीला सोलापूर येथील मुलींच्या निरीक्षण गृहात दाखल करण्यात आल्याची माहिती आहे.

या प्रकरणाची सुरुवात सांगोला पोलीस ठाण्यातून झाली असून, तेथून फिर्याद शून्य क्रमांकाने नाशिकच्या उपनगर पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आली. त्यानंतर बनावट कागदपत्रे तयार करणे,

 खोटी ओळख निर्माण करणे आणि अल्पवयीन मुलीचे लग्न लावून देण्याच्या कथित प्रकाराबाबत चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, या प्रकरणामागे आणखी किती जणांचा सहभाग आहे? अशा प्रकारे आणखी अल्पवयीन मुलींचे विवाह लावून देण्यात आले आहेत का? तसेच या कथित व्यवहारामध्ये पैशांची देवाणघेवाण नेमकी कशी झाली, याचा तपास नाशिक आणि सोलापूर पोलिसांकडून सुरू आहे.

या प्रकरणातील आरोपांची सत्यता तपास आणि न्यायालयीन प्रक्रियेत निश्चित होणे बाकी आहे.

Post a Comment

0 Comments