ग्रामीण युवकांसाठी सुवर्णसंधी; प्रत्येक गावात उभारणार ई-ॲग्री उद्योजक माणगंगा परिवार व ई-ॲग्री दुकानचा नाविन्यपूर्ण उपक्रम; व्यवसाय प्रशिक्षणासह आर्थिक सहाय्यही मिळणार
सांगोला | प्रतिनिधी ग्रामीण भागातील सुशिक्षित युवक-युवतींना गावातच रोजगार व स्वावलंबनाची संधी उपलब्ध करून देण्यासाठी माणगंगा परिवार आणि ई-ॲग्री दुकान यांच्या संयुक्त विद्यमाने "कृषी उद्योजक निवड अभियान २०२६" सुरू करण्यात आले आहे.
जिल्ह्यातील प्रत्येक गावातून एक पुरुष आणि एक महिला अशा दोन कृषी उद्योजकांची निवड केली जाणार असल्याची माहिती माणगंगा परिवाराचे अध्यक्ष नितीन इंगोले यांनी दिली.
या अभियानाच्या माध्यमातून आधुनिक शेती, कृषी निविष्ठा, पीक व्यवस्थापन, तांत्रिक मार्गदर्शन, कृषी औषधे, बियाणे, खते तसेच विविध डिजिटल कृषी सेवा थेट शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्याचे काम निवडलेल्या उद्योजकांकडून केले जाणार आहे.
त्यामुळे शेतकऱ्यांना गावपातळीवर दर्जेदार कृषी सेवा उपलब्ध होण्याबरोबरच ग्रामीण युवकांना स्वतःचा व्यवसाय उभारण्याची मोठी संधी मिळणार आहे.
या उपक्रमासाठी कोणत्याही शाखेतील पदवीधर किंवा शेती क्षेत्रातील किमान पाच वर्षांचा अनुभव असलेले, वय २६ वर्षांखालील युवक-युवती अर्ज करू शकतात.
प्रभावी संवाद कौशल्य, शेतकऱ्यांसोबत काम करण्याची तयारी आणि कृषी क्षेत्रात करिअर घडविण्याची इच्छा असलेल्या उमेदवारांना प्राधान्य दिले जाणार आहे.
निवड झालेल्या कृषी उद्योजकांना माणगंगा परिवारामार्फत व्यवसाय प्रशिक्षण, आर्थिक सहाय्य, तांत्रिक मार्गदर्शन आणि व्यवसाय विस्तारासाठी सातत्यपूर्ण सहकार्य दिले जाणार आहे.
ई-ॲग्री दुकान हे केवळ कृषी उत्पादन विक्री केंद्र न राहता आधुनिक शेतीसाठी आवश्यक असलेले पीक नियोजन, कृषी सल्ला, ड्रोनद्वारे पीक फवारणी, उपग्रह आधारित हवामान अंदाज आणि इतर व्यावसायिक कृषी सेवा उपलब्ध करून देणारे
सर्वसमावेशक केंद्र म्हणून विकसित करण्यात येणार आहे. या उपक्रमामुळे ग्रामीण भागात कृषी क्षेत्रातील नवउद्योजक तयार होऊन रोजगारनिर्मितीला मोठी चालना मिळेल, असा विश्वास नितीन इंगोले यांनी व्यक्त केला.
या अभियानात सहभागी होण्यासाठी इच्छुक युवक-युवतींनी तातडीने अर्ज करून संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
संपर्क :
श्री. स्वप्नील कुलकर्णी – ७४४८२३३८६४
श्री. पांडुरंग मते – ९९७५७४५३८०


0 Comments