Breaking News

सांगोला मार्केट यार्डात भरदिवसा अडीच लाखांची चोरी; शेतकऱ्याच्या वाहनातून रोकड लंपास

सांगोला मार्केट यार्डात भरदिवसा अडीच लाखांची चोरी; शेतकऱ्याच्या वाहनातून रोकड लंपास


सांगोला | प्रतिनिधी सांगोला कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरात भरदिवसा घडलेल्या धाडसी चोरीच्या घटनेने शेतकरी आणि व्यापारी वर्गात मोठी खळबळ उडाली आहे. 

डाळिंब विक्रीसाठी आलेल्या शेतकऱ्याच्या वाहनातून अज्ञात चोरट्याने तब्बल ₹2 लाख 50 हजारांची रोकड चोरून नेल्याची घटना

 5 ऑगस्ट 2026 रोजी सायंकाळी उघडकीस आली. या प्रकरणी सांगोला पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, रविंद्र महादेव तेली (वय 45, रा. सोनंद, ता. सांगोला) यांनी दुपारी स्टेट बँक ऑफ इंडिया, सांगोला शाखेतून ₹2.50 लाखांची रोकड काढली होती. 

ही रक्कम पिवळ्या रंगाच्या प्लास्टिकच्या पिशवीत ठेवून त्यांनी आपल्या अशोक लेलंड ‘बडा दोस्त’ वाहनाच्या डॅशबोर्डमधील कप्प्यात ठेवली.

यानंतर ते सांगोला मार्केट यार्डातील राजलक्ष्मी फ्रूट कंपनी (गाळा क्र. 27) येथे डाळिंब विक्रीसाठी गेले. वाहन लॉक करून ते माल विक्रीच्या कामात व्यस्त झाले. 

सायंकाळी सुमारे 6.40 वाजता वाहनाजवळ परत आल्यानंतर डाव्या बाजूची काच अर्धवट उघडी असल्याचे त्यांच्या लक्षात आले.

त्यानंतर त्यांनी डॅशबोर्डची पाहणी केली असता रोकड ठेवलेली पिशवी गायब असल्याचे आढळले. अज्ञात चोरट्याने अर्धवट उघड्या काचेतून हात घालून डॅशबोर्डमधील रोकड लंपास केल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

फिर्यादीनुसार, चोरीस गेलेल्या रकमेत ₹500 च्या चार बंडलांमध्ये 400 नोटा आणि ₹100 च्या पाच बंडलांमध्ये 500 नोटा असा एकूण ₹2 लाख 50 हजारांचा ऐवज होता.

या घटनेमुळे सांगोला मार्केट यार्डातील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. बाजार समिती परिसरात दररोज लाखो रुपयांची आर्थिक उलाढाल होत असल्याने वाहनांमध्ये रोकड ठेवताना अधिक सतर्कता बाळगण्याची गरज व्यक्त होत आहे.

दरम्यान, सांगोला पोलिसांनी घटनास्थळ परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी सुरू केली असून आरोपीचा शोध घेण्यासाठी तपासाची चक्रे वेगाने फिरू लागली आहेत.

 व्यापारी व शेतकरी वर्गाने चोरीतील आरोपींना तातडीने अटक करून बाजार परिसरातील सुरक्षा व्यवस्था अधिक बळकट करण्याची मागणी केली आहे.

Post a Comment

0 Comments