विठ्ठलाच्या साक्षीने ‘सद्बुद्धी दिंडी’; शक्तीपीठ महामार्गाविरोधात पंढरपुरात जनआक्रोश, डॉ. अनिकेत देशमुखांचा सरकारला इशारा
पंढरपूर | प्रतिनिधी प्रस्तावित शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधात पंढरपूर येथे विठ्ठल-रुक्मिणी मंदिर परिसरात रविवारी मोठ्या उत्साहात आणि निर्धाराने ‘सद्बुद्धी दिंडी’ काढण्यात आली.
भरपावसात हजारो शेतकरी, वारकरी, सामाजिक कार्यकर्ते आणि विविध पक्षांचे नेते सहभागी होत राज्य सरकारने शक्तीपीठ महामार्गाचा निर्णय तात्काळ रद्द करावा, अशी ठाम मागणी केली.
या आंदोलनात शेतकरी कामगार पक्षाचे चिटणीस मंडळाचे सदस्य तथा सांगोला तालुका शेतकरी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष डॉ. अनिकेत चंद्रकांत देशमुख यांनी सक्रिय सहभाग घेत महामार्गाला स्पष्ट विरोध दर्शविला.
त्यांनी शेतकऱ्यांच्या हितासाठी शासनाने जनभावनांचा आदर करून निर्णय मागे घ्यावा, असे आवाहन केले.
यावेळी बोलताना डॉ. देशमुख म्हणाले, "विकासाच्या नावाखाली सुपीक शेती नष्ट करून शेतकऱ्यांच्या उदरनिर्वाहावर घाला घालणे योग्य नाही. शेतीप्रधान देशात शेतकऱ्यांच्या जमिनी हिरावून घेण्याचा कोणताही निर्णय लोक स्वीकारणार नाही.
शासनाने लोकांच्या भावना आणि शेतकऱ्यांचे हित लक्षात घेऊन प्रस्तावित शक्तीपीठ महामार्ग तातडीने रद्द करावा."
या दिंडीत आमदार जयंत पाटील, खासदार धैर्यशील मोहिते-पाटील, माजी खासदार राजू शेट्टी, माजी मंत्री महादेव जानकर, आमदार अमित देशमुख, कैलास पाटील,
अभिजित पाटील यांच्यासह विविध राजकीय पक्षांचे लोकप्रतिनिधी, शेतकरी संघटनांचे पदाधिकारी आणि वारकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले.
आंदोलनादरम्यान "शेतकऱ्यांच्या जमिनी वाचवा", "शक्तीपीठ महामार्ग रद्द करा" अशा घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला. १३ जिल्ह्यांतील बाधित शेतकरी
आणि शक्तीपीठ विरोधी संघर्ष समितीच्या प्रतिनिधींनी हा निर्णय मागे घेतला जाईपर्यंत लोकशाही मार्गाने संघर्ष अधिक तीव्र करण्याचा निर्धार व्यक्त केला.
वारकरी परंपरा, धार्मिक वारसा, सुपीक शेती आणि ग्रामीण जनजीवनाचे संरक्षण करण्यासाठी सुरू असलेल्या या लढ्याला राज्यभरातील विविध सामाजिक,
धार्मिक आणि शेतकरी संघटनांचा वाढता पाठिंबा मिळत असून, सरकारने जनभावनांचा सन्मान करून योग्य निर्णय घ्यावा, अशी एकमुखी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली.


0 Comments