लक्ष्मीनगरच्या विकासासाठी मैदानात कैलास हिप्परकर; ग्रामपंचायत निवडणुकीत सेवाभावी नेतृत्वाची हाक
लक्ष्मीनगर (प्रतिनिधी) : आगामी ग्रामपंचायत निवडणूक २०२६ च्या पार्श्वभूमीवर लक्ष्मीनगर गावातील सामाजिक कार्यकर्ते कैलास हिप्परकर यांनी गावाच्या सर्वांगीण विकासाच्या उद्देशाने निवडणूक लढवण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.
विकास, पारदर्शक प्रशासन आणि जनसहभाग या त्रिसूत्रीवर भर देत त्यांनी ग्रामस्थांसमोर आपला विकासाचा आराखडा मांडला आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून कैलास हिप्परकर हे गावातील शेतकरी, युवक, महिला आणि सर्वसामान्य नागरिकांच्या विविध प्रश्नांवर सातत्याने काम करत आहेत.
गावातील मूलभूत सुविधा अधिक सक्षम करणे, नागरिकांना आवश्यक सेवा उपलब्ध करून देणे आणि गावाचा नियोजनबद्ध विकास घडवून आणणे हेच आपले प्रमुख ध्येय असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
यासाठी त्यांनी पाच महत्त्वाच्या मुद्द्यांवर आधारित विकास आराखडा जाहीर केला आहे. त्यामध्ये शुद्ध पिण्याच्या पाण्याचा नियमित पुरवठा, गावातील
अंतर्गत तसेच वाड्या-वस्त्यांवरील रस्त्यांचा विकास, जिल्हा परिषद शाळांचे आधुनिकीकरण, नियमित आरोग्य शिबिरे, शेतकऱ्यांसाठी विविध शासकीय योजनांचा लाभ,
ठिबक सिंचन व जलसंधारण प्रकल्प, युवकांसाठी कौशल्य विकास केंद्र, महिलांच्या बचतगटांना प्रोत्साहन तसेच ग्रामपंचायतीच्या निधीचा पारदर्शक वापर करून भ्रष्टाचारमुक्त प्रशासन राबविण्याचा समावेश आहे.
यावेळी कैलास हिप्परकर म्हणाले, "मी ही निवडणूक केवळ राजकारणासाठी नव्हे, तर गावसेवेच्या भावनेतून लढवत आहे. ग्रामस्थांच्या विश्वासाच्या बळावर लक्ष्मीनगरला आदर्श गाव बनविण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करणार असून विकास हाच माझा एकमेव अजेंडा असेल."
त्यांच्या या भूमिकेचे गावातील अनेक नागरिकांनी स्वागत केले असून, विकासाभिमुख आणि लोकाभिमुख नेतृत्वाला संधी मिळावी, अशी चर्चा गावात सुरू आहे. ग्रामपंचायत निवडणुकीची अधिकृत घोषणा झाल्यानंतर प्रचाराला वेग येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
'लक्ष्मीनगरचा विकास... जनतेच्या विश्वासातून!' या घोषवाक्यासह कैलास हिप्परकर यांनी ग्रामस्थांना विकासाच्या या प्रवासात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.


0 Comments