खिलारवाडी–हलदहिवडी सिमेंट रस्त्याचे भूमिपूजन; सहा गावांच्या वाहतुकीला मिळणार नवी दिशा
शुभारंभ मा.आमदार शहाजी बापू पाटील यांच्या हस्ते उत्साहात
सांगोला | प्रतिनिधी सांगोला तालुक्यातील ग्रामीण विकासाच्या दृष्टीने महत्त्वाचा ठरणाऱ्या खिलारवाडी (बागल वस्ती) ते हलदहिवडी या 4.50 किलोमीटर लांबीच्या सिमेंट काँक्रीट रस्त्याच्या कामाचा
शुभारंभ आमदार शहाजी बापू पाटील यांच्या हस्ते उत्साहात झाला. सुमारे ७ कोटी रुपयांच्या निधीतून साकार होणारा हा रस्ता परिसरातील नागरिकांसाठी विकासाचा नवा टप्पा ठरणार आहे.
या रस्त्यामुळे केवळ खिलारवाडी आणि हलदहिवडी नव्हे, तर गायगव्हाण, तिसंगी, गार्डी आणि शिरभावी या गावांनाही थेट लाभ मिळणार आहे.
शेतकरी, विद्यार्थी, कामगार तसेच सर्वसामान्य नागरिकांचा दैनंदिन प्रवास अधिक सुरक्षित आणि सुलभ होणार असून दूध व ऊस वाहतुकीलाही मोठी चालना मिळणार आहे.
भूमिपूजन सोहळ्यात बोलताना आमदार शहाजी बापू पाटील यांनी खिलारवाडीशी असलेल्या आपल्या जिव्हाळ्याच्या नात्याचा उल्लेख केला.
"मी आमदार असो वा नसो, तालुक्यातील सर्वसामान्य नागरिकांच्या मूलभूत प्रश्नांसाठी कायम प्रयत्नशील राहीन. राज्य शासनाकडून अधिकाधिक निधी आणून तालुक्यातील विकासकामे पूर्णत्वास नेण्याचा माझा प्रयत्न राहील," असे त्यांनी सांगितले.
याचबरोबर या परिसरातील प्रलंबित कॅनॉलच्या फाट्याचा प्रश्नही लवकरच मार्गी लावण्याचे आश्वासन त्यांनी दिले.
या कार्यक्रमाला जिल्हा परिषद सदस्य दादासाहेब लवटे, पंचायत समिती सदस्य बाळासाहेब बंडगर यांच्यासह उमेश पाटील, मानाजी खिलारी, प्रल्हाद खांडेकर, शंतनू खिलारी, सिद्धेश्वर गाडे, अमित पाटील,
ओंकार पाटील, उमेश चव्हाण, विकास इंगोले, विजयसिंह खबाले तसेच अनेक कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ग्रामीण भागातील दळणवळण अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने हा रस्ता महत्त्वपूर्ण ठरणार असून परिसरातील आर्थिक आणि सामाजिक विकासालाही या प्रकल्पामुळे मोठी चालना मिळेल, अशी भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली.


0 Comments