Breaking News

अपघात रोखण्यासाठी सांगोला पोलिसांचा अनोखा उपक्रम; अपघातग्रस्त दुचाकीचे प्रदर्शन, रस्त्यांवर जनजागृतीचे संदेश

अपघात रोखण्यासाठी सांगोला पोलिसांचा अनोखा उपक्रम;


अपघातग्रस्त दुचाकीचे प्रदर्शन, रस्त्यांवर जनजागृतीचे संदेश

सांगोला | प्रतिनिधी तालुक्यात वाढत्या रस्ते अपघातांच्या पार्श्वभूमीवर नागरिकांमध्ये वाहतूक नियमांविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी सांगोला पोलीस ठाण्याने अनोख्या जनजागृती मोहिमेला सुरुवात केली आहे.

 रस्ते सुरक्षा हा केवळ नियमांचा विषय नसून प्रत्येकाच्या जीवाशी निगडित आहे, हा संदेश प्रभावीपणे पोहोचविण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत.

या मोहिमेअंतर्गत सांगोला शहरातील प्रमुख चौक, रस्ते व गर्दीच्या ठिकाणी सुरक्षित वाहनचालनेबाबत माहिती देणारे आकर्षक संदेशफलक उभारण्यात आले आहेत.

 हेल्मेटचा वापर, वेगमर्यादेचे पालन, मद्यपान करून वाहन न चालविणे तसेच वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन या फलकांद्वारे करण्यात येत आहे.

विशेष म्हणजे, भीषण अपघातात नुकसान झालेली दुचाकी सार्वजनिक ठिकाणी प्रदर्शित करून निष्काळजीपणाचे गंभीर परिणाम नागरिकांसमोर प्रत्यक्ष स्वरूपात मांडण्यात आले आहेत. 

या प्रदर्शनामुळे वाहनचालकांना सुरक्षिततेचे महत्त्व अधिक प्रभावीपणे पटवून देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

"Helmet is costly, But Brain is priceless!" आणि "अति घाई संकटात नेई" यांसारख्या प्रभावी संदेशांद्वारे नागरिकांना हेल्मेटचा नियमित वापर, संयमी वाहनचालना आणि वाहतूक नियमांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

या जनजागृती अभियानाचा शुभारंभ सांगोला पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत करण्यात आला. यावेळी सर्व नागरिकांनी हेल्मेट व सीटबेल्टचा वापर करावा,

 वेगमर्यादेचे पालन करावे आणि वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करून स्वतःसह इतरांचाही जीव सुरक्षित ठेवावा, असे आवाहन सांगोला पोलिसांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments