Breaking News

बार्शीत धक्कादायक घटना : पतीच्या छळाला कंटाळलेल्या आईकडून १० महिन्यांच्या चिमुरडीची हत्या; सहा वर्षांच्या मुलीचा जीव थोडक्यात बचाव

बार्शीत धक्कादायक घटना : पतीच्या छळाला कंटाळलेल्या आईकडून १० महिन्यांच्या चिमुरडीची हत्या; सहा वर्षांच्या मुलीचा जीव थोडक्यात बचाव


बार्शी | प्रतिनिधी सोलापूर जिल्ह्यातील बार्शी शहरात रविवारी अत्यंत धक्कादायक घटना समोर आली. पतीकडून होत असलेल्या कथित छळाला कंटाळून २६ वर्षीय महिलेने 

आपल्या अवघ्या १० महिन्यांच्या मुलीचा जीव घेतल्याचा आरोप असून, या घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

प्राथमिक माहितीनुसार, आरोपी महिलेने प्रथम मुलीचा गळा दाबला आणि त्यानंतर तिला पाण्याने भरलेल्या बादलीत बुडवून ठार केल्याचा आरोप आहे. 

याच वेळी तिने आपल्या सहा वर्षांच्या मोठ्या मुलीलाही जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचे समोर आले आहे. मात्र, “आई, मी शाळेत शिकते... मला मारू नको,” अशी मुलीने केलेली आर्त विनंती ऐकून महिलेने तिचा जीव वाचवला.

घटनेनंतर आरोपी महिला मृत चिमुरडीला खांद्यावर घेऊन थेट बार्शी शहर पोलीस ठाण्यात पोहोचली. “पतीच्या त्रासाला कंटाळून मी माझ्या मुलीची हत्या केली आहे. 

मला अटक करा,” असे तिने पोलिसांना सांगितल्याने पोलीस अधिकारी आणि कर्मचारीही काही काळ स्तब्ध झाले.

त्यानंतर पोलिसांनी १० महिन्यांच्या ‘शक्ती’ या चिमुरडीला तातडीने ग्रामीण रुग्णालयात नेले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीनंतर तिला मृत घोषित केले.

या घटनेबाबतची महत्त्वाची माहिती मृत बालिकेची सहा वर्षांची मोठी बहीण तेजल हिने पोलिसांना दिली असून, तिच्या जबाबाच्या आधारे तपासाला गती देण्यात आली आहे.

या प्रकरणी पूजा योगेश खुर्दामळे हिच्याविरुद्ध बार्शी शहर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १०३(१) (खून) तसेच कलम १०९ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

पतीकडून होत असलेल्या कथित छळाची पार्श्वभूमी, कौटुंबिक वाद आणि या घटनेमागील नेमके कारण काय, याचा सखोल तपास बार्शी शहर पोलीस करीत आहेत.

या हृदयद्रावक घटनेने बार्शीसह संपूर्ण सोलापूर जिल्ह्यात खळबळ उडाली असून, निरागस चिमुरडीच्या मृत्यूबद्दल सर्वत्र शोक व्यक्त केला जात आहे.

Post a Comment

0 Comments