सांगोल्यात मध्यरात्री दरोडेखोरांचा धुमाकूळ! फळांनी भरलेली पिकअप लुटली; चालकाला बेदम मारहाण, ६.७० लाखांचा ऐवज गायब
सांगोला / प्रतिनिधी : सांगोला तालुक्यातील कडलास परिसरात मध्यरात्री घडलेल्या धाडसी लुटीच्या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
फळांनी भरलेली महिंद्रा पिकअप अडवून चार अज्ञात दरोडेखोरांनी चालकावर स्टीलच्या रॉडने हल्ला करत वाहनासह लाखो रुपयांचा मुद्देमाल लंपास केला.
या प्रकरणी सांगोला पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तामिळनाडू राज्यातील कृष्णगिरी येथील अरूल वेल्याअपन्न (वय ३६) हे महिंद्रा पिकअप (क्रमांक TN-24 BA-1216) मधून डाळींब, पेरू व ड्रॅगन फळांची वाहतूक करत होते.
गुरुवारी (दि. ३० जुलै) पहाटे सुमारे १.४५ वाजण्याच्या सुमारास कडलास गावापासून सुमारे एक किलोमीटर अंतरावर दोन मोटारसायकलींवर आलेल्या चार अज्ञात इसमांनी त्यांचे वाहन अडवले.
आरोपींनी चालकाला जबरदस्तीने वाहनातून खाली उतरवून स्टीलच्या रॉडने मारहाण केली. त्यानंतर जीवे मारण्याची धमकी देत पिकअप वाहन,
त्यातील फळांचा माल आणि मोबाईल फोन असा एकूण सुमारे ६ लाख ७० हजार रुपयांचा मुद्देमाल घेऊन ते घटनास्थळावरून पसार झाले.
लंपास झालेल्या मालामध्ये
८० कॅरेट डाळींब – अंदाजे ₹१.७० लाख
२५ कॅरेट पेरू – अंदाजे ₹६५ हजार
२२ कॅरेट ड्रॅगन फळ – अंदाजे ₹२५ हजार
महिंद्रा पिकअप – अंदाजे ₹४ लाख
व्हिवो V40 मोबाईल – अंदाजे ₹१० हजार
या घटनेप्रकरणी सांगोला पोलीस ठाण्यात भाग-५ गुन्हा रजिस्टर क्रमांक ६७६/२०२६ अन्वये बीएनएस कलम ३०९(४) व ३(५) अंतर्गत अज्ञात चार आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गुरव करीत असून, आरोपींचा शोध घेण्यासाठी विशेष पथके रवाना करण्यात आली आहेत.
मध्यरात्री महामार्गालगत घडलेल्या या धाडसी लुटीमुळे फळवाहतूक करणाऱ्या चालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, ग्रामीण रस्त्यांवरील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.


0 Comments