Breaking News

आषाढी वारीच्या भाविकांकडून आर्थिक पिळवणुकीचा आरोप; अनकढाळ टोलनाक्यावरील कारवाईवर प्रश्नचिन्ह

आषाढी वारीच्या भाविकांकडून आर्थिक पिळवणुकीचा


आरोप; अनकढाळ टोलनाक्यावरील कारवाईवर प्रश्नचिन्ह

सांगोला | प्रतिनिधी आषाढी वारीसाठी पंढरपूरकडे जाणाऱ्या भाविकांच्या वाहनांवर अनकढाळ टोलनाक्यावर महामार्ग वाहतूक पोलिसांकडून होत असलेल्या कारवाईबाबत नाराजी व्यक्त होत 

असून, काही वाहनधारकांनी आर्थिक पिळवणूक होत असल्याचा आरोप केला आहे. या प्रकरणाची वरिष्ठ अधिकाऱ्यांनी चौकशी करून वस्तुस्थिती समोर आणावी, अशी मागणी पुढे येत आहे.

दरवर्षीप्रमाणे यंदाही कर्नाटक, कोकण, कोल्हापूर, सांगली, गोवा आदी भागांतून हजारो वारकरी श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी पंढरपूरकडे रवाना झाले आहेत. 

अनेक दिंड्यांसोबत जेवणाचे साहित्य, सामान आणि सेवेसाठी वाहनेही असतात. तसेच अनेक भाविक स्वतःच्या चारचाकी वाहनांतून वारीसाठी येतात.

काही वाहनधारकांच्या म्हणण्यानुसार, अनकढाळ टोलनाक्यावर वाहने थांबवून वाहतूक नियमांच्या नावाखाली वारंवार तपासणी केली जात असून, 

त्यामुळे भाविकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. काहींनी आर्थिक व्यवहार होत असल्याचाही आरोप केला आहे. मात्र या आरोपांची अधिकृत पुष्टी झालेली नाही.

वाहतूक नियमांचे पालन करणे प्रत्येक वाहनधारकाचे कर्तव्य असले तरी, नियमांची अंमलबजावणी करताना जनजागृती, समुपदेशन आणि पारदर्शकता यांनाही तितकेच महत्त्व दिले पाहिजे, अशी अपेक्षा वाहनधारकांकडून व्यक्त होत आहे.

याच महामार्गावर वारंवार अपघात घडत असताना, प्रतिबंधात्मक उपाययोजनांवर अधिक भर देण्याची गरज असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. 

अपघातप्रवण ठिकाणी प्रभावी वाहतूक नियंत्रण आणि मार्गदर्शन करण्याऐवजी केवळ दंडात्मक कारवाईवर भर दिला जात असल्याची टीकाही काही वाहनधारकांनी केली.

दरम्यान, संबंधित प्रकरणातील आरोपांची निष्पक्ष चौकशी करून दोषी आढळल्यास योग्य ती कारवाई करावी, 

तसेच भाविकांना विनाकारण त्रास होणार नाही याची दक्षता घ्यावी, अशी मागणी वारकरी व वाहनधारकांकडून होत आहे.

Post a Comment

0 Comments