Breaking News

कर्जमाफी योजनेतील अटी रद्द करुन शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करा; आ. डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी विधानसभेत केली मागणी

कर्जमाफी योजनेतील अटी रद्द करुन शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करा;


आ. डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी विधानसभेत केली मागणी

सांगोला - राज्य शासनाने जाहीर केलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजनेतील सर्व जाचक अटी रद्द करून सर्व शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करावा, अशी ठाम मागणी आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी विधानसभेत केली.

मुंबई येथील अधिवेशनामध्ये सांगोल्याचे आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी आपल्या भाषणात शेतकरी, आरोग्य, महिला बचत गट आणि ग्रामीण पायाभूत सुविधांशी संबंधित अनेक प्रश्न शासनासमोर मांडत तातडीने निर्णय घेण्याची मागणी केली.

 कर्जमाफीच्या निर्णयाबाबत त्यांनी योजनेतील अटींमुळे मोठ्या संख्येने शेतकरी कर्जमाफीपासून वंचित राहत असल्याने शासनाने सर्वसमावेशक निर्णय घेऊन बळीराजाला दिलासा द्यावा, असे त्यांनी सांगितले.

तसेच राज्यात संभाव्य एल निनोच्या पार्श्वभूमीवर कमी पावसाचा अंदाज व्यक्त होत असल्याने दुष्काळी परिस्थितीचा सामना करण्यासाठी शासनाने आतापासूनच नियोजन करावे, अशी मागणीही त्यांनी केली.

 नदीकाठच्या गावांमध्ये अत्यल्प व खंडित वीजपुरवठ्यामुळे शेतकऱ्यांना सिंचनासाठी मोठ्या अडचणी येत असून अखंडित वीजपुरवठा उपलब्ध करून द्यावा, असेही त्यांनी सांगितले.

मे व जून २०२६ मधील अवकाळी पावसामुळे मतदारसंघातील फळबागांचे मोठे नुकसान झाले असून त्याची नुकसानभरपाई तातडीने द्यावी, 

तसेच भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेअंतर्गत २०२३-२४ मध्ये लागवड केलेल्या सहा हजारांहून अधिक शेतकऱ्यांचे प्रलंबित दुसरे व तिसरे हप्ते त्वरित वितरित करावेत, अशी मागणी त्यांनी केली.

मुख्यमंत्री बळीराजा आनंद रस्त्यांची योजनेसाठी मंजूर केलेला निधी अपुरा असल्याचे सांगत, ग्रामीण भागातील प्रलंबित रस्त्यांची कामे पूर्ण करण्यासाठी किमान पाच हजार कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून द्यावा,

 अशी मागणीही त्यांनी सभागृहात केली. महिला बचत गटांसाठी जिल्हास्तरावर कायमस्वरूपी विक्री केंद्र, महिला बाजार, मोफत प्रदर्शन

 सहभाग आणि प्रत्येक तालुक्यात कॉमन फॅसिलिटी सेंटर उभारण्यासाठी निधी देण्याची मागणीही त्यांनी केली. अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्या मानधनवाढीचा निर्णय तातडीने घ्यावा.

भाषणातील ठळक बाबी -

- सांगोला ट्रॉमा केअर सेंटरमध्ये रिक्त परिचारिका व नर्सिंग स्टाफची पदे तातडीने भरावीत.

- शस्त्रक्रियांसाठी आवश्यक आधुनिक यंत्रसामग्री व उपकरणांसाठी निधी द्यावा.

- ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्रांतील रिक्त पदे तत्काळ भरावीत.

- भाळवणी येथील मंजूर ग्रामीण रुग्णालयावरील स्थगिती उठवून काम सुरू करावे.

- प्राथमिक आरोग्य केंद्रांना रुग्णवाहिका व शववाहिनी उपलब्ध करून द्यावी.

- तालुका स्तरावर सीटी स्कॅन, एमआरआय आणि ब्लड बँक सुविधा उपलब्ध कराव्यात.

- अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्या मानधनवाढीचा निर्णय तातडीने घ्यावा.

- पोलीस वसाहतीचा प्रश्न शासनाने मार्गी लावावा.

Post a Comment

0 Comments