ज्येष्ठांच्या हक्कांसाठी आमदार देशमुख सरसावले; मागण्या अधिवेशनात मांडण्याचे आश्वासन
सांगोला : तालुक्यातील ज्येष्ठ नागरिकांच्या विविध प्रलंबित प्रश्नांना न्याय मिळवून देण्यासाठी आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी पुढाकार घेतला आहे.
समर्थ यश नागरिक संघाच्या वतीने सादर करण्यात आलेल्या निवेदनातील सर्व मागण्या शासन दरबारी मांडून त्यासाठी पाठपुरावा करू, असे आश्वासन त्यांनी दिले.
समर्थ यश नागरिक संघ, सांगोला तालुक्याच्या पदाधिकाऱ्यांनी आमदार डॉ. देशमुख यांची भेट घेऊन ज्येष्ठ नागरिकांच्या विविध समस्या व मागण्यांबाबत सविस्तर निवेदन सादर केले.
राज्यातील ज्येष्ठ नागरिकांसाठी लागू असलेल्या शासकीय सवलती आणि कल्याणकारी योजना ६५ वर्षांऐवजी ६० वर्षांपासून लागू कराव्यात, अशी प्रमुख मागणी यावेळी करण्यात आली.
यासोबतच राज्यातील ज्येष्ठ नागरिकांना दरमहा किमान तीन हजार रुपये मानधन स्वरूपात आर्थिक सहाय्य देण्याची मागणी करण्यात आली.
ज्येष्ठ नागरिकांसाठी स्थापन करण्यात आलेल्या आर्थिक महामंडळावर ५० टक्के प्रतिनिधित्व देण्याची तसेच कोविड काळात बंद करण्यात
आलेली रेल्वे प्रवास सवलत पुन्हा सुरू करण्याची मागणीही निवेदनात करण्यात आली.
ज्येष्ठ नागरिकांच्या प्रश्नांना विधिमंडळात प्रभावीपणे आवाज मिळावा
यासाठी महाराष्ट्र ज्येष्ठ नागरिक महासंघाचे दोन प्रतिनिधी विधानपरिषदेत नियुक्त करावेत, अशी मागणी संघटनेने केली.
तसेच तेलंगणा राज्यातील कर्मचारी उत्तरदायित्व व पालक आधार देखरेख विधेयक-२०२०च्या धर्तीवर महाराष्ट्रात कायदा करावा
आणि केरळप्रमाणे स्वतंत्र ज्येष्ठ नागरिक आयुक्तालय स्थापन करावे, अशीही अपेक्षा व्यक्त करण्यात आली.
यावेळी संघाचे अध्यक्ष नवनाथ पवार, कार्याध्यक्ष अरुण वाघमोडे गुरुजी, सचिव वसंत बजरंग दिघे गुरुजी तसेच निवृत्त प्रशासन अधिकारी विष्णू चव्हाण गुरुजी उपस्थित होते.
निवेदन स्वीकारल्यानंतर आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी ज्येष्ठ नागरिकांच्या मागण्यांबाबत सकारात्मक भूमिका घेत
येत्या अधिवेशनात हा विषय मांडून आवश्यक तो पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले.
चौकट:
ज्येष्ठांच्या प्रश्नांसाठी आमदार देशमुखांची ग्वाही; अधिवेशनात मांडणार मागण्या
ज्येष्ठ नागरिकांच्या हक्कांसाठी समर्थ यश नागरिक संघाचे निवेदन
६० वर्षांपासून शासकीय सवलती लागू करण्याची मागणी; आमदार देशमुखांकडून पाठपुराव्याचे आश्वासन
ज्येष्ठ नागरिकांच्या कल्याणासाठी ठोस निर्णयांची मागणी शासनाकडे


0 Comments