दुष्काळी सांगोल्यात जैवविविधतेचा चमत्कार! झाडावर राहणारा दुर्मिळ बेडूक आढळला
कोकणात आढळणाऱ्या चार-रेषीय ट्री फ्रॉगची सांगोल्यात नोंद; पर्यावरणप्रेमींमध्ये उत्सुकता
सांगोला : दुष्काळी परिस्थितीसाठी ओळखल्या जाणाऱ्या सांगोला तालुक्यात जैवविविधतेचे अनोखे दर्शन घडले आहे. झाडांवर वास्तव्य करणारा दुर्मिळ
"चार-रेषीय ट्री फ्रॉग" (Polypedates leucomystax) हा बेडूक नुकताच सांगोल्यात आढळून आल्याने पर्यावरणप्रेमी आणि वन्यजीव अभ्यासकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.
प्राणीमित्र आणि सर्पमित्र म्हणून परिचित असलेले संदेश पलसे यांना एका मित्राने दुकानातील कपाटावरील काचेला चिकटून बसलेल्या अनोख्या बेडकाबाबत माहिती दिली.
माहिती मिळताच पलसे यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत बेडकाला सुरक्षितपणे पकडले आणि पुढील ओळख पटवण्यासाठी प्राणीशास्त्रज्ञांकडे नेले.
प्राणीशास्त्र विषयाचे प्रा. डॉ. विधीन कांबळे यांनी प्राथमिक निरीक्षणानंतर हा झाडांवर राहणाऱ्या बेडकांच्या प्रजातीतील दुर्मिळ प्रकार असल्याचे सांगितले. अधिक खात्रीसाठी बेडकाचे छायाचित्र डॉ. एन. डी. पाटील महाविद्यालय, मलकापूर येथील प्राणीशास्त्र विभागाचे अभ्यासक प्रा. अभिजित माने यांच्याकडे पाठविण्यात आले.
प्रा. माने यांनी हा बेडूक "चार-रेषीय ट्री फ्रॉग" (Polypedates leucomystax) असल्याचे स्पष्ट केले. दक्षिण आणि आग्नेय आशियात आढळणारा हा उभयचर प्राणी प्रामुख्याने जंगल परिसर, शेती, तलावांच्या काठावरील ओलसर भाग आणि मानवी वस्त्यांजवळ वास्तव्य करतो.
पावसाळ्यात हा बेडूक बदकाच्या आवाजासारखा "क्वॅक" असा आवाज काढतो. मादी बेडूक झाडांच्या फांद्यांवर किंवा पाण्याजवळ फेसाळ घरटी तयार करून त्यामध्ये अंडी घालते. त्यातून बाहेर पडणारी पिले थेट पाण्यात पडतात किंवा पावसाच्या पाण्यासोबत वाहून जातात.
रात्री सक्रिय असणारा हा बेडूक प्रामुख्याने कीटकांवर उपजीविका करतो. कधीकधी तो लहान पालींचीही शिकार करतो. त्याचवेळी पक्षी, साप आणि सरडे हे त्याचे नैसर्गिक भक्षक मानले जातात.
दुष्काळी पट्टा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सांगोल्यात या दुर्मिळ बेडकाची नोंद होणे ही केवळ आश्चर्याची बाब नसून, येथील समृद्ध होत असलेल्या जैवविविधतेचे सकारात्मक संकेत मानले जात आहेत.


0 Comments