Breaking News

चिकमहुदमध्ये विवाहितेवर अत्याचाराचा प्रयत्न; घरात घुसून विनयभंग, मारहाण आणि जीवे मारण्याची धमकी

चिकमहुदमध्ये विवाहितेवर अत्याचाराचा प्रयत्न; घरात घुसून विनयभंग, मारहाण आणि जीवे मारण्याची धमकी


सांगोला | प्रतिनिधी सांगोला तालुक्यातील चिकमहुद येथील बंडगरवाडी क्रमांक १ मध्ये एका विवाहित महिलेचा विनयभंग करून मारहाण केल्याची गंभीर घटना समोर आली आहे.

 या प्रकरणी नवनाथ विठ्ठल कारांडे याच्याविरुद्ध सांगोला पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेअंतर्गत विविध गंभीर कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १५ जून रोजी दुपारी सुमारे १ वाजण्याच्या सुमारास संबंधित महिला आपल्या घरात प्लंबिंगच्या कामासाठी वाळू पसरत होती.

 त्यावेळी आरोपी नवनाथ कारांडे हा घरात आला. घरात सुरू असलेल्या कामावरून त्याने प्लंबिंग कामगाराशी वाद घालत त्याला तेथून निघून जाण्यास सांगितले.

यानंतर आरोपीने संबंधित महिलेशी कौटुंबिक कारणावरून वाद घालत शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. 

फिर्यादीनुसार, आरोपीने महिलेला अश्लील शब्दांत धमकावत तिच्याशी झटापट केली. तसेच तिचे कपडे ओढून विनयभंग करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे.

महिलेने विरोध केल्यानंतर आरोपीने तिला खाली ढकलून मारहाण केली. या घटनेत महिलेला दुखापत झाली असून दगड फेकून तिच्या डाव्या पायालाही इजा केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

दरम्यान, हा प्रकार थांबविण्यासाठी पुढे आलेल्या महिलेच्या सासूलाही आरोपीने मारहाण केल्याचा आरोप आहे. तसेच दोघींनाही जीवे मारण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

घटनेनंतर परिसरात संतापाचे वातावरण निर्माण झाले असून महिलांच्या सुरक्षेबाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

या प्रकरणी सांगोला पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ५४८/२०२६ नोंद करण्यात आला असून आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता (बीएनएस) कलम ३३३, ७४, ७५(२), ७६, ११८(१), ११५(२), ३५१(२), ३५१(३) आणि ३५२ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस हवालदार कोष्टी यांनी या प्रकरणाची नोंद केली असून पुढील तपास ग्रेड पोलीस उपनिरीक्षक कदम करीत आहेत.

Post a Comment

0 Comments