मंगळवेढ्यात संतापजनक घटना; तीन वर्षीय चिमुरडीवरील
अत्याचारप्रकरणी अल्पवयीन ताब्यात
मंगळवेढा | प्रतिनिधी मंगळवेढा तालुक्यातील ग्रामीण भागात अवघ्या तीन वर्षे दोन महिने वयाच्या चिमुरडीवर लैंगिक अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.
या प्रकरणी मंगळवेढा पोलिसांनी तातडीने कारवाई करत १७ वर्षीय अल्पवयीन संशयिताला ताब्यात घेतले असून, संपूर्ण तालुक्यात संतापाची लाट उसळली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पीडित बालिकेच्या आजीने संबंधित प्रकार पाहिल्यानंतर त्वरित मंगळवेढा पोलीस ठाण्यात धाव घेत
फिर्याद दाखल केली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी तत्काळ तपास सुरू करत काही तासांतच संशयिताला ताब्यात घेतले.
पीडित चिमुरडीला वैद्यकीय तपासणीसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, वैद्यकीय अहवालानंतर प्रकरणाचे संपूर्ण स्वरूप स्पष्ट होणार आहे.
पीडित कुटुंबीयांच्या फिर्यादीवरून संशयिताविरुद्ध बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा (पॉक्सो),
अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा तसेच अन्य संबंधित कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या संवेदनशील प्रकरणाचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. बसवराज शिवपुजे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून,
आरोपी अल्पवयीन असल्याने पुढील प्रक्रिया किशोर न्याय कायद्याच्या तरतुदीनुसार केली जाणार आहे.
दरम्यान, या अमानुष घटनेतील दोषींवर कठोर कारवाई करून पीडित कुटुंबाला न्याय मिळावा, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.


0 Comments