रेल्वे अपघातानंतर गूढ वळण; मृत तरुणाचा अवयव नातेवाइकांच्या घराजवळ आढळल्याने पंढरपूरात खळबळ
पंढरपूर | प्रतिनिधी पंढरपूर शहरात रेल्वे अपघातानंतर उघडकीस आलेल्या एका धक्कादायक घटनेमुळे नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास २४ वर्षीय रिक्षाचालकाचा रेल्वेच्या धडकेत मृत्यू झाला.
मात्र, त्यानंतर मृत व्यक्तीचा एक अवयव नातेवाइकांच्या घराजवळ आढळून आल्याने या प्रकरणाने गूढ स्वरूप धारण केले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रोहित मधुकर कोरे (वय २४) यांचा मंगळवारी रात्री सुमारे १२.१५ वाजता टेंभुर्णी रेल्वे गेट परिसरात रेल्वेच्या धडकेत मृत्यू झाला.
घटनेची माहिती रेल्वे प्रशासनाकडून पोलिसांना देण्यात आल्यानंतर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत पंचनामा आणि तपासाची प्रक्रिया सुरू केली.
तपासादरम्यान शहरातील एका घराच्या दरवाजाजवळ मानवी पायाचा तुकडा आढळून आला. प्राथमिक तपासात
हा अवयव मृत रोहित कोरे यांचाच असल्याचे समोर आले. अपघातस्थळापासून हा अवयव नातेवाइकांच्या घरापर्यंत कसा पोहोचला, याबाबत अद्याप स्पष्टता आलेली नाही.
या घटनेनंतर रोहित यांच्या नातेवाइकांनी संताप व्यक्त करत मृत्यूबाबत संशय व्यक्त केला आहे.
काही व्यक्तींशी पूर्वी वाद झाल्याचा दावा करत, हा केवळ अपघात नसून घातपात असू शकतो, असा आरोप कुटुंबीयांनी केला आहे.
दरम्यान, पोलिसांनी या आरोपांची नोंद घेत सर्व शक्यतांचा तपास सुरू केला असून, घटनास्थळावरील पुरावे,
सीसीटीव्ही फुटेज आणि संबंधित व्यक्तींची चौकशी केली जात आहे. अधिकृत तपास पूर्ण होईपर्यंत मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होऊ शकलेले नाही.
या संपूर्ण घटनेमुळे पंढरपूर शहरात खळबळ उडाली असून, पोलिसांच्या तपासाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


0 Comments