"वर्षभरापासून जमीन प्रकरण रखडले; ७८ वर्षीय ज्येष्ठाचा
सांगोला तहसील कार्यालयासमोर आत्मदहनाचा इशारा"
सांगोला | प्रतिनिधी कडलास (ता. सांगोला) येथील भोगवटादार वर्ग-२ जमिनीचे प्रकरण
गेल्या वर्षभरापासून प्रलंबित असल्याने त्रस्त झालेल्या ७८ वर्षीय ज्येष्ठ नागरिक नामदेव राजाराम लिगाडे (रा. कडलास)
यांनी प्रशासनाविरोधात संताप व्यक्त करत तहसील कार्यालयासमोर आत्मदहन करण्याचा इशारा दिला आहे.
त्यांच्या या भूमिकेमुळे महसूल विभागात खळबळ उडाली असून प्रकरण पुन्हा चर्चेत आले आहे.
लिगाडे यांच्या मालकीच्या गट क्रमांक ९६० मधील जमीन खुली करून खरेदी-विक्रीस परवानगी मिळावी यासाठी त्यांनी
जून २०२५ पासून तहसील कार्यालयाकडे सातत्याने पाठपुरावा सुरू ठेवला आहे. संबंधित प्रकरणाची चौकशी मंडळ अधिकारी, जवळा यांच्याकडे सोपविण्यात आली होती.
चौकशीदरम्यान मागविण्यात आलेली सर्व कागदपत्रे, सातबारा उतारे, फेरफार नोंदी तसेच इतर आवश्यक पुरावे त्यांनी वेळोवेळी सादर केल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
तहसील प्रशासनाने निर्देशित केलेल्या त्रुटींची पूर्तता देखील करण्यात आली. मात्र, अभिलेख शाखेकडून काही जुने अभिलेख व फेरफार नोंदी
उपलब्ध नसल्याचे कळविण्यात आले. संबंधित कागदपत्रे शासकीय अभिलेखांमध्ये उपलब्ध नसतानाही त्याचा फटका अर्जदाराला बसत असल्याचा आरोप लिगाडे यांनी केला आहे.
ज्येष्ठ नागरिक असलेल्या लिगाडे यांना वारंवार तहसील कार्यालयाच्या फेऱ्या माराव्या लागत
असून त्यामुळे मानसिक, शारीरिक आणि आर्थिक त्रास सहन करावा लागत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
काही कर्मचाऱ्यांनी सहकार्य केल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले असले तरी अंतिम निर्णय न झाल्याने नाराजी कायम असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात त्यांनी प्रकरण तातडीने निकाली काढावे, उपलब्ध अभिलेखांच्या आधारे कायदेशीर निर्णय घ्यावा,
दिरंगाईस जबाबदार अधिकाऱ्यांची चौकशी करावी, ज्येष्ठ नागरिक म्हणून प्रकरणास प्राधान्य द्यावे तसेच कार्यवाहीचा लेखी अहवाल द्यावा, अशा प्रमुख मागण्या केल्या आहेत.
दरम्यान, मागण्यांवर तातडीने सकारात्मक निर्णय न झाल्यास १० जून २०२६ रोजी सकाळी ११.३० वाजता
तहसील कार्यालयासमोर आत्मदहन करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. त्यामुळे प्रशासन या प्रकरणात काय भूमिका घेणार, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.
चौकट :
वर्षभरापासून पाठपुरावा करूनही निर्णय नाही; दिरंगाईमुळे त्रस्त झालेल्या ज्येष्ठ नागरिकाची प्रशासनाकडे न्यायाची मागणी


0 Comments