राजेंद्र राऊत यांच्या विजयासाठी शिवसेना पूर्ण ताकदीने मैदानात;
सांगोल्यातील सर्व ३४ मते महायुतीच्या उमेदवारालाच – शहाजीबापू पाटील
सोलापूर | प्रतिनिधी सोलापूर विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीचे अधिकृत उमेदवार राजेंद्र राऊत यांच्या विजयासाठी शिवसेना पूर्ण ताकदीने मैदानात उतरली असून
जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधींनी एकजुटीने काम करण्याचा निर्धार व्यक्त केला. सोलापूर येथील बालाजी सरोवर हॉटेलमध्ये आयोजित शिवसेनेच्या जिल्हास्तरीय बैठकीत हा निर्धार व्यक्त करण्यात आला.
बैठकीला जिल्ह्यातील नगरसेवक, नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, जिल्हा परिषद सदस्य तसेच शिवसेना व महायुतीचे प्रमुख पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी राजेंद्र राऊत यांना विक्रमी मताधिक्याने विजयी करण्याचा संकल्प करण्यात आला.
शिवसेना उपनेते तथा माजी आमदार शहाजीबापू पाटील यांनी आपल्या भाषणात सांगितले की, "राजेंद्र राऊत हे संघर्षातून पुढे आलेले नेतृत्व आहे. त्यांचा विजय उमेदवारी जाहीर झाल्यापासूनच निश्चित झाला आहे.
सांगोला तालुक्यातील सर्व ३४ मते राजेंद्र राऊत यांनाच मिळतील. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर शिवसैनिकांचा पूर्ण विश्वास असून एका मताचाही फरक पडणार नाही."
पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी विकासाच्या मुद्द्यावर भर देत महायुतीतील सर्व घटक पक्षांनी समन्वयाने काम करण्याचे आवाहन केले. "भविष्यातील विकास हेच आपले प्रमुख उद्दिष्ट असून विकास निधीच्या बाबतीत कोणतीही अडचण येऊ दिली जाणार नाही," असे त्यांनी स्पष्ट केले.
उद्योग व मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनीही शिवसेना महायुतीसोबत खंबीरपणे उभी असल्याचे सांगत, "राजेंद्र राऊत यांच्या विजयासाठी शिवसैनिक पूर्ण क्षमतेने काम करतील आणि त्यांना मोठ्या मताधिक्याने विजयी करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करतील," असा विश्वास व्यक्त केला.
महायुतीचे उमेदवार राजेंद्र राऊत यांनी उपस्थित सर्व नेत्यांचे आभार मानताना, "जिल्हाभरातील महायुतीचे सर्व घटक पक्ष माझ्या पाठीशी ठामपणे उभे आहेत.
शहाजीबापू पाटील, पालकमंत्री जयकुमार गोरे यांसारख्या ज्येष्ठ आणि प्रभावी नेत्यांचे मार्गदर्शन लाभत असल्याने सर्वांच्या आशीर्वादाने विजय निश्चित होईल, अशी अपेक्षा आहे," असे सांगितले.
बैठकीस उद्योग व मराठी भाषा मंत्री उदय सामंत, पालकमंत्री जयकुमार गोरे, खासदार धैर्यशील माने, माढा लोकसभा संपर्कप्रमुख पैलवान चंद्रहार पाटील,
शिवसेना उपनेते शहाजीबापू पाटील, माजी आमदार सिद्धाराम म्हेत्रे यांच्यासह जिल्ह्यातील अनेक पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी जिल्ह्यातील तसेच सांगोला तालुक्यातील नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य, नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष यांनी राजेंद्र राऊत यांच्या विजयासाठी एकजुटीने काम करण्याचा निर्धार व्यक्त केला.


0 Comments