दिघंची ते भोसे राज्य मार्गाच्या कायापालटाला वेग;
आमदार डॉ. बाबासाहेब देशमुखांच्या पाठपुराव्यामुळे ३४२ कोटींचा निधी मंजूर
सांगोला : सांगोला विधानसभा मतदारसंघातील वाहतूक आणि दळणवळण व्यवस्थेला मोठी चालना देणारा महत्त्वाचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे.
आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे राज्य मार्ग क्रमांक ३८६ अंतर्गत दिघंची जिल्हा हद्द ते वाणी चिंचाळे-भोसे या प्रमुख मार्गाच्या उन्नतीकरणासाठी तब्बल ३४२ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.
या निधीतून दिघंची जिल्हा हद्द, खवासपूर, लोटेवाडी, सोनलवाडी, एखतपूर, सांगोला, वाढेगाव, मेडशिंगी, आलेगाव, वाकी, घेरडी, वाणी चिंचाळे ते भोसे या मार्गावरील रस्त्यांची सुधारणा
आणि मजबुतीकरणाची कामे हाती घेतली जाणार आहेत. त्यामुळे अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या या महत्त्वाच्या मार्गाचा कायापालट होणार असल्याचे चित्र आहे.
अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे या रस्त्यासाठी विशेष निधीची मागणी केली होती. त्यानंतर शासनाने या मागणीची सकारात्मक दखल घेत निधी मंजूर केला आहे.
या रस्त्याच्या विकासामुळे सांगोला तालुक्यातील शेतकरी, व्यापारी, विद्यार्थी आणि प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.
विशेषतः शेतमालाची वाहतूक अधिक सुलभ होऊन बाजारपेठांशी संपर्क वाढणार असल्याने ग्रामीण अर्थव्यवस्थेलाही बळ मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
निधी मंजूर झाल्यानंतर आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच ग्रामविकास मंत्री व सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांचे आभार मानले.
सांगोला तालुक्याच्या विकासाच्या दृष्टीने हा निधी महत्त्वाचा टप्पा ठरणार असून राज्य मार्ग क्रमांक ३८६ च्या उन्नतीकरणामुळे ग्रामीण भागातील दळणवळण व्यवस्था अधिक सक्षम होणार आहे.


0 Comments