Breaking News

सांगोला विद्यामंदिरमध्ये १२ वीच्या गुणवंतांचा गौरव; शिस्त, समर्पण आणि योग्य निर्णय' हाच यशाचा मंत्र-डॉ.बसवराज शिवपुजे

सांगोला विद्यामंदिरमध्ये १२ वीच्या गुणवंतांचा गौरव; शिस्त, समर्पण आणि योग्य निर्णय' हाच यशाचा मंत्र-डॉ.बसवराज शिवपुजे


सांगोला(प्रतिनिधी)सांगोला तालुका शिक्षण प्रसारक मंडळ सांगोला संचलित सांगोला विद्यामंदिर ज्युनिअर कॉलेजमध्ये 

इयत्ता १२ वी बोर्ड परीक्षा व MHT-CET २०२६ मधील गुणवंत विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांचा सत्कार समारंभ मोठ्या उत्साहात आणि दिमाखदार सोहळ्यात पार पडला. 

या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना मंगळवेढा विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. बसवराज शिवपुजे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना अत्यंत कल्पकतेने थ्री-डी (3D) सूत्राची प्रभावी गुंफण केली. 

शिस्त (Discipline) समर्पण (Dedication) आणि योग्य निर्णय (Decision) या त्रिसूत्रीचा जीवनात अंगीकार करणे हाच यशाचा खरा मंत्र असल्याचे सांगून त्यांनी विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन केले.

यावेळी व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष व संस्थाध्यक्ष प्रा. प्रबुद्धचंद्र झपके, सचिव मल्लिकार्जुन घोंगडे, खजिनदार शंकरराव सावंत, सांगोला विद्यामंदिर प्राचार्य चारुदत्त जगताप, नाझरा विद्यामंदिरचे 

प्राचार्य अमोल गायकवाड, सांगोला विद्यामंदिरचे उपमुख्याध्यापक प्रदीप धुकटे, उपप्राचार्य शिवशंकर तटाळे, पर्यवेक्षक काकासो नरूटे, शुभांगी घोंगडे उपस्थित होते.

याप्रसंगी कला, शास्त्र आणि वाणिज्य शाखेतील बोर्ड परीक्षेत प्रथम आलेले विद्यार्थी, विषयवार प्रथम आलेले विद्यार्थी तसेच MHT-CET २०२६ मध्ये विशेष प्राविण्य मिळवलेल्या सर्व गुणरत्नांचा आणि त्यांच्या पालकांचा सत्कार

 सन्मानचिन्ह,पुष्पगुच्छ आणि संस्था व शिक्षक यांच्याकडून रोख रक्कम देऊन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी सन २०२५-२६ मध्ये कार्यरत असणारे प्राचार्य 

अमोल गायकवाड व विद्यार्थ्यांच्या यशात मोलाचा वाटा उचलणाऱ्या सर्व मार्गदर्शक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचा सत्कार करण्यात आला. सत्काराला उत्तर देताना गुणवंत विद्यार्थी धीरज जगताप, स्नेहल बोधगिरे, दिपाली भोसले,

 श्रीकांत सातपुते आणि पालक रामेश्वर अवताडे यांनी अत्यंत भावनिक शब्दांत आपले मनोगत व्यक्त करताना संस्था, संस्थाध्यक्ष, पदाधिकारी, ज्युनिअर कॉलेजचे मार्गदर्शक शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांच्या कार्याचा गौरव केला.

या प्रेरणादायी सोहळ्यासाठी विद्यार्थी, पालक आणि शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविकातून प्राचार्य चारुदत्त जगताप यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले व ज्युनिअर कॉलेज, 

गुणवंत विद्यार्थ्यांच्या देदीप्यमान यशाचा आढावा घेत सर्व विद्यार्थ्यांचे व पालकांच्या योगदानाचे कौतुक केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. धनाजी चव्हाण यांनी केले, तर आभार प्रदर्शन उपप्राचार्य शिवशंकर तटाळे यांनी केले.

     ध्येय गाठताना येणाऱ्या प्रत्येक आव्हानावर मात करून जो यश खेचून आणतो, तोच खरा गुणवंत ठरतो. विद्यार्थ्यांचा आजचा हा सन्मान त्यांच्या याच अपार कष्टाची आणि पालकांच्या त्यागाची फलश्रुती आहे. 

त्यामुळे आवडीचे क्षेत्र निवडा आणि त्यात आनंदाने झोकून द्या. इतरांशी स्वतःची तुलना करण्यापेक्षा प्रयत्नांत सातत्य ठेवा. 

स्वतःच्या कामाचे वेळोवेळी आत्मपरीक्षण करून चुका सुधारा. तसेच, उत्तम आरोग्याला प्राधान्य देत पुरेशी विश्रांती, शांत झोप, सकस आहार घ्या आणि मोबाईलचा मोह टाळा.

 *डॉ. बसवराज शिवपुजे* (उपविभागीय पोलीस अधिकारी, मंगळवेढा)

चौकट:

प्रत्येक आलेल्या अनुभवातून कायम काहीतरी नवीन शिका आणि स्वतःच्या कष्टावर ठाम विश्वास ठेवून आत्मविश्वासाने पुढे जा. जीवनाच्या प्रवासात येणाऱ्या प्रत्येक परिस्थितीला खंबीरपणे सामोरे जा आणि कायम नव्या,

 दुप्पट उमेदीने आपल्या ध्येयाकडे वाटचाल करा. आज यश संपादन केलेल्या सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे आणि त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या राहणाऱ्या पालकांचे कार्य खरोखरच कौतुकास्पद आहे. विद्यार्थ्यांनी पुढील शैक्षणिक वाटचालीतही हाच आत्मविश्वास कायम ठेवावा.

 *प्रा प्रबुद्धचंद्र झपके* 

   संस्थाध्यक्ष 

सां.ता.शि.प्र.मंडळ,सांगोला

Post a Comment

0 Comments