सांगोला नगरपरिषदेत 'आंतरराष्ट्रीय एकल महिला दिन' उत्साहात साजरा;
विविध शासकीय योजनांची दिली माहिती
सांगोला (प्रतिनिधी): दरवर्षी २३ जून रोजी जगभरात साजरा केला जाणारा 'आंतरराष्ट्रीय एकल महिला दिन' (विधवा, घटस्फोटीत, अविवाहित किंवा पतीपासून विभक्त झालेल्या महिला) सांगोला नगरपरिषदेच्या वतीने अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला.
समाज, कुटुंब आणि प्रशासकीय पातळीवर एकल महिलांना भेडसावणाऱ्या समस्यांकडे लक्ष वेधणे, त्यांच्या हक्कांचे रक्षण करणे, त्यांना स्वावलंबी बनवून समाजात सन्मानाची वागणूक मिळवून देणे हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश होता.
कार्यक्रमाचे उद्घाटन महिला व बाल कल्याण समितीच्या सभापती सौ. छायाताई मेटकरी यांच्या हस्ते महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सौ. छायाताई मेटकरी या होत्या.
याप्रसंगी आरोग्य सभापती सौ.गोदाताई बनसोडे, नगरसेविका सौ.राणी माने, सौ. आशादेवी यावलकर, सौ. श्रद्धा साबळे, सौ.अनिता केदार,
सौ. सुजाता केदार, सौ. वैशाली झपके, सौ. शोभा फुले सौ. सौ.सीमा सरगर, तनुजा एरंडे तसेच नगरपरिषदेचे मुख्याधिकारी डॉ. सुधीर गवळी आदी प्रमुख अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला मुख्याधिकारी डॉ. सुधीर गवळी यांनी प्रास्ताविक केले व आंतरराष्ट्रीय एकल महिला दिनाचे उद्दिष्ट स्पष्ट केले.
यावर्षी महात्मा ज्योतिबा फुले यांच्या द्विशताब्दी जयंतीचे निमित्त साधून कार्यालयीन अधीक्षक श्री. सचिन पाडे यांनी महात्मा फुले यांच्या जीवनकार्यावर आपले मनोगत व्यक्त केले.
कर निरीक्षक प्रियांका पाटील यांनी एकल महिलांकरिता असलेल्या विविध आर्थिक व सामाजिक स्थैर्य मिळवून देणाऱ्या शासकीय योजनांची सविस्तर माहिती दिली. या प्रसंगी उपस्थित अनेक एकल महिलांनी आपल्याला भेडसावणाऱ्या विविध समस्यांवर आपले मत मांडले.
उपस्थितांना मार्गदर्शन करताना नगरसेविका राणीताई माने यांनी एकल महिलांच्या पाठीशी नगरपालिका खंबीरपणे उभे असल्याचे सांगितले. आपल्या अध्यक्षीय भाषणात महिला व बाल कल्याण सभापती सौ. छायाताई मेटकरी यांनी, "एकल महिलांच्या आर्थिक
व सामाजिक सक्षमीकरणासाठी आणि त्यांना समाजात समानतेचा अधिकार मिळवून देण्यासाठी सांगोला नगरपरिषद कटिबद्ध आहे," असे सांगितले. या कार्यक्रमाला सांगोला शहरातील एकल महिला बहुसंख्येने उपस्थित होत्या.
सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शरद थोरात, जयश्री खडतरे, सविता लोखंडे, कोमल चांडोले, सारिका लोखंडे आणि प्रतिभा कोरे यांनी विशेष प्रयत्न केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहायक प्रकल्प अधिकारी योगेश गंगाधरे यांनी केले, तर आभार प्रदर्शन कर निरीक्षक अस्मिता निकम यांनी केले. कार्यक्रमाला सांगोला नगरपरिषदेचे सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.


0 Comments