Breaking News

सांगोल्याच्या प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आमदार डॉ.बाबासाहेब देशमुख यांच्या पाठपुराव्याला यश; आगाराला मिळणार ५ नवीन एसटी बसेस

सांगोल्याच्या प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आमदार डॉ.बाबासाहेब देशमुख यांच्या पाठपुराव्याला यश;


आगाराला मिळणार ५ नवीन एसटी बसेस

सांगोला | प्रतिनिधी सांगोला तालुक्यातील एसटी प्रवाशांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. सांगोला विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे

 महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या सांगोला आगारासाठी पाच नवीन आधुनिक एसटी बसेस मंजूर झाल्या असून, त्या पुढील आठवड्यात आगारात दाखल होणार आहेत.

सोलापूर–सांगली महामार्गावरील महत्त्वाचे आगार म्हणून ओळख असलेल्या सांगोला आगारातून दररोज हजारो प्रवासी विविध गावांमध्ये, तालुक्यांमध्ये तसेच सोलापूर, पुणे, कोल्हापूरसह अन्य शहरांकडे प्रवास करतात. 

मात्र, उपलब्ध बसांची संख्या अपुरी असल्याने अनेकदा प्रवाशांना अडचणींचा सामना करावा लागत होता. विशेषतः विद्यार्थी, शेतकरी, महिला आणि रोजंदारीवर काम करणाऱ्या नागरिकांना याचा मोठा फटका बसत होता.

ही समस्या लक्षात घेऊन आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला. 

तसेच संबंधित अधिकाऱ्यांशी वेळोवेळी चर्चा करून सांगोला आगाराला अतिरिक्त बसेस उपलब्ध करून देण्याची मागणी लावून धरली. अखेर या प्रयत्नांना यश मिळाले असून पाच नवीन बसेस मंजूर करण्यात आल्या आहेत.

या नवीन बसेसमुळे सांगोला ते सोलापूर, पुणे, कोल्हापूर तसेच इतर मार्गांवरील बससेवा अधिक सक्षम होणार आहे. प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेऊन फेऱ्यांमध्ये वाढ होण्यास मदत होईल. तसेच वेळापत्रक अधिक नियमित होऊन ग्रामीण भागातील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

याबाबत बोलताना आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख म्हणाले, "सांगोला तालुक्यातील प्रत्येक नागरिकाला दर्जेदार आणि सुलभ सार्वजनिक वाहतूक सेवा मिळावी, यासाठी माझे प्रयत्न सातत्याने सुरू आहेत. येत्या काळात आणखी नवीन बसेस आणि नवीन मार्ग मंजूर करण्यासाठीही पाठपुरावा सुरू राहील."

दरम्यान, नवीन बसेस मंजूर झाल्याबद्दल सांगोला आगाराचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आमदार देशमुख यांचे आभार मानले. तालुक्यातील नागरिकांनीही या निर्णयाचे स्वागत केले असून, विद्यार्थी, शेतकरी आणि सर्वसामान्य प्रवाशांसाठी ही मोठी दिलासादायक बाब असल्याची भावना व्यक्त केली आहे.

या बसेस मंजूर करण्यासाठी सहकार्य केल्याबद्दल आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक तसेच ग्रामविकास मंत्री व सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांचे आभार मानले.

Post a Comment

0 Comments