Breaking News

धक्कादायक ! पत्नीवर कोयत्याने सपासप वार करून हत्या; पंढरपुरातील कोर्टीत खळबळ

धक्कादायक ! पत्नीवर कोयत्याने सपासप वार करून हत्या; पंढरपुरातील कोर्टीत खळबळ


पंढरपूर : पंढरपूर तालुक्यातील कोर्टी येथील पडोळे मळा परिसरात घडलेल्या एका हृदयद्रावक घटनेने संपूर्ण तालुका हादरला आहे. 

पत्नीवर कोयत्याने सपासप वार करून तिची हत्या करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला.

याप्रकरणी आरोपी पती नवनाथ गोडसे याच्याविरुद्ध पंढरपूर ग्रामीण पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, नातेवाईकांनी आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली आहे.

मनीषा नवनाथ गोडसे (वय ३७) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी (दि.२६) सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास आरोपी नवनाथ गोडसे याने पत्नी मनीषा गोडसे यांच्यावर कोयत्याने सपासप वार केले. 

रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या मनीषा यांना नातेवाईक आणि मुलांनी तातडीने सोलापूर येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचार सुरू असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली.

या घटनेनंतर पडोळे मळा परिसरात शोककळा पसरली असून, नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. 

प्राथमिक माहितीनुसार, आरोपीला दारूचे व्यसन असल्याची चर्चा असून, नेमक्या कोणत्या कारणाचा तपास पोलीस करत आहेत.

नराधमाला फाशीची शिक्षा व्हावी

मयताची बहीण संगीता जाधव यांनी आरोपीला कठोर शिक्षा देण्याची मागणी केली. माझ्या बहिणीचा अत्यंत निर्दयीपणे खून करण्यात आला. 

अशा नराधमाला फाशीची शिक्षा झाली पाहिजे. आमच्या कुटुंबाला न्याय मिळालाच पाहिजे, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.

यापूर्वीही केला होता हल्ला

मयताचे भाऊ सुनील सुखदेव देवमारे यांनीही आरोपीविरोधात गंभीर आरोप केले. लग्नानंतर तो सतत माझ्या बहिणीचा छळ आणि मारहाण करत होता. 

यापूर्वीही त्याने तिला पेटत्या चुलीत ढकलून दिले होते. त्या वेळी ती गंभीर भाजली होती. आता कोयत्याने वार करून तिचा जीव घेतला. 

अशा व्यक्तीला कठोरातील कठोर शिक्षा म्हणजे फाशीच झाली पाहिजे,अशी मागणी त्यांनी केली.

कौटुंबिक हिंसाचाराचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर

या घटनेमुळे कौटुंबिक हिंसाचाराचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. पोलीस या प्रकरणाचा सर्वंकष तपास करत 

असून, आरोपीविरुद्ध कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी नातेवाईकांसह नागरिकांतूनही जोर धरत आहे.

Post a Comment

0 Comments