Breaking News

जावयाच्या अंगठीसाठी चार दिवसांची धावपळ; अखेर मुक्या मांजरीचा बळी, बीडमधील घटना चर्चेत

जावयाच्या अंगठीसाठी चार दिवसांची धावपळ; अखेर मुक्या मांजरीचा बळी, बीडमधील घटना चर्चेत


बीड | प्रतिनिधी अधिकमासानिमित्त जावयाला सोन्याची अंगठी भेट देण्याचा सासरकडील अनोखा प्रयत्न अखेर एका दुर्दैवी घटनेत बदलला. जावयाला 

सरप्राईज देण्यासाठी धोंड्यात लपवून ठेवलेली सोन्याची अंगठी चुकून एका मांजरीने गिळल्याने संपूर्ण कुटुंबाची चार दिवस धावपळ उडाली.

 मात्र अंगठी मिळवण्याच्या प्रयत्नात त्या मुक्या प्राण्याचा जीव गेला असून बीड जिल्ह्यात या घटनेची जोरदार चर्चा सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अधिकमासातील पारंपरिक "धोंडे जेवण" कार्यक्रमासाठी जावयाला सोन्याची अंगठी भेट देण्याचे ठरविण्यात आले होते. 

अंगठी धोंड्यात लपवून ठेवून जावयाला आनंदाचा धक्का देण्याची तयारी सुरू असतानाच घरात आलेल्या मांजरीने तो धोंडा गिळला.

अंगठी परत मिळावी या आशेने मांजरीला घरात ठेवून तिच्या विष्ठेतून अंगठी बाहेर पडण्याची वाट पाहण्यात आली. तब्बल चार दिवस प्रयत्न करूनही अंगठी सापडली नाही. 

त्यानंतर मांजरीला पशुवैद्यकांकडे नेण्यात आले. औषधोपचार आणि उलटी करण्याचे प्रयत्नही करण्यात आले; मात्र ते निष्फळ ठरले. उपचारादरम्यान मांजरीचा मृत्यू झाला.

यानंतर मृत मांजरीच्या पोटावर शस्त्रक्रिया करण्यात आली आणि त्यातून सोन्याची अंगठी बाहेर काढण्यात आली. अंगठी मिळाली खरी, पण त्यासाठी एका मुक्या जीवाचा बळी गेल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, अधिकमासात जावयाला मानपान देण्याची परंपरा महाराष्ट्रातील अनेक भागांत आजही जपली जाते. 

मात्र अशा परंपरांमध्ये महागड्या भेटवस्तूंचा वाढता वापर आणि त्यातून निर्माण होणारे सामाजिक व आर्थिक प्रश्न यावरही चर्चा सुरू झाली आहे.

अंगठी मिळाली; पण गेला मुक्या जीवाचा प्राण... बीडमधील ही घटना सध्या सर्वत्र चर्चेचा विषय ठरत आहे.

Post a Comment

0 Comments