Breaking News

आई-वडिलांचे छत्र हरपलेल्या प्रियंकेला माणुसकीचा आधार; शिरभावीत कार्यकर्त्यांकडून विवाहासाठी मदतीचा हात

आई-वडिलांचे छत्र हरपलेल्या प्रियंकेला माणुसकीचा आधार;


शिरभावीत कार्यकर्त्यांकडून विवाहासाठी मदतीचा हात

सांगोला | प्रतिनिधी सांगोला तालुक्यातील शिरभावी येथील कु. प्रियंका खिलारे हिच्या आयुष्यात काही वर्षांपूर्वी आई-वडिलांच्या निधनामुळे मोठे दुःख ओढवले. मायेचे छत्र हरपल्यानंतर तिच्यासमोर अनेक अडचणी उभ्या राहिल्या. 

मात्र, अशा कठीण काळात शिरभावी गावातील सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या कार्यकर्त्यांनी तिच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहत माणुसकीचे दर्शन घडवले.

दिपक आबा साळुंखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गावातील कार्यकर्त्यांनी प्रियंकाला अन्नधान्य, आर्थिक मदत आणि विविध स्वरूपाचे सहकार्य करून तिच्या आयुष्याला आधार दिला. संकटाच्या काळात दिलेला हा हात तिच्यासाठी मोठा आधार ठरला.

आज प्रियंकाच्या आयुष्यातील आनंदाचा क्षण उजाडला असून तिचा शुभविवाह संपन्न होत आहे. या मंगल प्रसंगी सखुबाई वाघमारे यांनी तिला संसारोपयोगी कपाट भेट देत

 नव्या आयुष्याच्या वाटचालीस शुभेच्छा दिल्या. याशिवाय, गावातील कार्यकर्त्यांनी स्वखर्चाने वर्गणी गोळा करून विवाहासाठी आर्थिक मदत करत सामाजिक एकोप्याचे अनोखे उदाहरण घालून दिले.

शिरभावीतील या उपक्रमातून ‘समाजाचे आपण काहीतरी देणे लागतो’ हा विचार प्रत्यक्ष कृतीतून दिसून आला. गरजवंतांच्या मदतीला धावून जाण्याची परंपरा आणि माणुसकीची श्रीमंती जपणाऱ्या कार्यकर्त्यांच्या या कार्याचे परिसरात कौतुक होत आहे.

"मदतीचा हात हा केवळ दान नसतो, तर तो नव्या आयुष्याला दिलेला आत्मविश्वास असतो," अशी भावना यावेळी ग्रामस्थांनी व्यक्त केली.

Post a Comment

0 Comments