Breaking News

लक्ष्मीनगरात अवैध वाळू वाहतुकीवर पोलिसांचा प्रहार; टाटा इंट्रासह ४.०७ लाखांचा मुद्देमाल जप्त

लक्ष्मीनगरात अवैध वाळू वाहतुकीवर पोलिसांचा प्रहार; टाटा इंट्रासह ४.०७ लाखांचा मुद्देमाल जप्त


सांगोला | प्रतिनिधी तालुक्यातील लक्ष्मीनगर परिसरात सुरू असलेल्या अवैध वाळू वाहतुकीविरोधात 

सांगोला पोलिसांनी धडक कारवाई करत एका टाटा इंट्रा पिकअपसह सुमारे ४ लाख ७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

 या प्रकरणी लक्ष्मीनगर येथील एका युवकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, कारवाईमुळे अवैध वाळू व्यवसाय करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.

पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांचे पथक ११ जून रोजी सायंकाळी गस्त घालत असताना

 आचकदाणी-लक्ष्मीनगर मार्गावरील मोरे यांच्या खडी क्रेशरजवळ संशयास्पद वाहन आढळून आले. 

एमएच २७ डीटी १३३४ क्रमांकाच्या टाटा इंट्रा वाहनाची तपासणी केली असता त्यामध्ये अंदाजे एक ब्रास वाळू भरलेली असल्याचे निदर्शनास आले.

चालकाकडे वाळू वाहतुकीसाठी आवश्यक असलेले कोणतेही अधिकृत परवाने अथवा रॉयल्टी भरल्याचे दस्तऐवज नसल्याने पोलिसांनी चौकशी केली.

 त्यावेळी आरोपी प्रेम खंडू सावंत (वय २४, रा. लक्ष्मीनगर) हा माण नदीपात्रातून विनापरवाना वाळू उपसा करून तिची विक्री करण्यासाठी वाहतूक करत असल्याचे उघड झाले.

या कारवाईत ४ लाख रुपये किमतीचे टाटा इंट्रा वाहन आणि ७ हजार रुपये किंमतीची एक ब्रास वाळू असा एकूण ४ लाख ७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

या संदर्भात पोलीस कॉन्स्टेबल अतुल खराडे यांच्या फिर्यादीवरून आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता (बीएनएस) कलम ३०३(२)

 व ३०५(ई) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्ह्याची नोंद पोहेकॉं. वाघ यांनी केली असून, पुढील तपास पोहेकॉं. माने करत आहेत.

दरम्यान, तालुक्यात वाढत्या अवैध वाळू उपसा आणि वाहतुकीला आळा घालण्यासाठी सांगोला पोलिसांनी विशेष मोहीम सुरू केली असून, येत्या काळात अशा कारवायांची तीव्रता

 आणखी वाढविण्यात येणार असल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले. त्यामुळे वाळू माफियांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Post a Comment

0 Comments