जुनोनीजवळ भीषण अपघात : भरधाव कारच्या धडकेत जुजारपूरच्या युवकाचा मृत्यू, एक जण जखमी
सांगोला | प्रतिनिधी सांगोला तालुक्यातील जुनोनी गावाजवळ राष्ट्रीय महामार्ग क्रमांक १६६ वर भरधाव कारने दुचाकीला दिलेल्या जोरदार धडकेत
जुजारपूर येथील एका युवकाचा मृत्यू झाला असून दुसरा युवक जखमी झाला आहे. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, विशाल भिमराव गाडे (वय ४३, रा. जुजारपूर) हे रविवारी (दि. ७ जून) रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास त्यांच्या दुचाकीवरून चेतन संभाजी शितोळे यांच्यासह पाचेगाव फाट्याकडे जात होते.
जुनोनी गावच्या हद्दीतील श्रीराम वस्ती परिसरात राष्ट्रीय महामार्गावर त्यांच्या दुचाकीला पाठीमागून येणाऱ्या भरधाव कारने जोरदार धडक दिली.
धडक इतकी भीषण होती की, दुचाकीस्वार विशाल गाडे गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने उपचारासाठी हलविण्यात आले;
मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. दुचाकीवरील मागील बाजूस बसलेले चेतन शितोळे हे जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
अपघातात दुचाकी आणि कार या दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. या प्रकरणी विशाल गाडे यांचे काका मुरलीधर दगडू गाडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कार चालक
समाधान नाना सुरवसे (रा. भंडीशेगाव, ता. पंढरपूर) याच्याविरुद्ध सांगोला पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी भारतीय न्याय संहिता (बीएनएस) कलम २८१, १०६(१), ३२४(४), १२५ (अ), १२५ (ब) तसेच मोटार वाहन कायदा कलम १८४ अंतर्गत गुन्हा नोंदविला असून पुढील तपास पोहेकॉ. बोराटे करीत आहेत.
दरम्यान, या दुर्दैवी घटनेमुळे जुजारपूर परिसरात हळहळ व्यक्त होत असून राष्ट्रीय महामार्गावरील बेदरकार वाहनचालकांवर कठोर कारवाईची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.


0 Comments