भाजपसोबत शेकाप अन् राष्ट्रवादीचे आमदार; विधान परिषद निवडणूक, साेलापूर जिल्ह्यात महाविकास आघाडीमध्ये फूट
सोलापूर : विधान परिषदेच्या सोलापूर स्थानिक प्राधिकारी मतदारसंघ निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या
अखेरच्या दिवशी महाविकास आघाडीतील विसंवाद आणि महायुतीतील बंडखोरी उघडपणे समोर आली.
भाजप उमेदवार राजेंद्र राऊत यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी शेकापचे आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख,
करमाळ्यातील राष्ट्रवादी काँग्रेस (शप)चे आमदार नारायण पाटील उपस्थित होते.
तर महायुतीतील शिवसेनेच्या खासदार डॉ. ज्योती वाघमारे आणि माजी आमदार शहाजी पाटील हे भाजपसोबत दिसले. मोहोळचे शिवसेना नगरसेवक
रमेश बारसकर व पंढरपूरचे महेश साठे यांनी महायुतीचा धर्म मोडत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
जिल्ह्यातील शिवसेनेत दोन गट उघडे पडले असून, माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांच्या समर्थक नगरसेवकांनी महेश साठे यांच्या रूपाने अपक्ष उमेदवार मैदानात उतरविला आहे.
खासदार वाघमारे व माजी आमदार शहाजी पाटील हे भाजपसोबत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष व शिवसेना
उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानेही या निवडणुकीसाठी महाविकास आघाडीचा धर्म मोडला आहे.
महाविकास आघाडीतून सोलापूरची जागा काँग्रेसकडे आली आहे. काँग्रेसने आदित्य फत्तेपूरकर यांना उमेदवारी दिली आहे.
राष्ट्रवादीने जिल्हाध्यक्ष वसंतराव देशमुख व जीवन जानकर यांना अपक्ष म्हणून मैदानात उतरविले आहे. शिवसेनेकडून कुर्डुवाडीचे धनंजय डिकोळे
आणि बार्शीचे नागेश अक्कलकोटे यांनी अपक्ष म्हणून अर्ज दाखल केला आहे. भाजप व त्यांच्या मित्रपक्षाकडे तगडे बहुमत आहे.
कोण मैदानात राहणार नाही याचे चित्र अर्ज माघारीच्या (ता. ४) दिवशी स्पष्ट होणार आहे.
अशी केली काँग्रेसने जुळवाजुळव
या निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी मतदार यादीतील १० सूचक आवश्यक आहेत. काँग्रेसकडे आवश्यक असलेले संख्याबळ पाहता,
त्यांच्या चिन्हावर विजयी झालेले १० सूचक मतदारही नाहीत, अशी स्थिती आहे.
महाविकास आघाडीतील काँग्रेसचे उमेदवार फत्तेपूरकर हे पंढरपूर काँग्रेसचे शहराध्यक्ष आहेत.
त्यांनी पंढरपूर न.प.ची निवडणूक तीर्थक्षेत्र विकास आघाडीतून लढवून विजय मिळविला.
भालके यांनी शिवसेनेत प्रवेश केला. फत्तेपूरकर काँग्रेसमध्येच थांबले व महाविकास आघाडीतील काँग्रेसचे उमेदवार झाले.
त्यांना सूचक बार्शीतील शिवसेना (उबाठा) चार, तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या तीन, काँग्रेसच्या दोन, तर अकलूजमधील एका नगरसेवकाने स्वाक्षरी केली आहे.
साठेंच्या मागे म्हेत्रेंची ताकद
शिवसेना नेते तथा माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांनी पंढरपूरचे महेश साठे यांना अपक्ष म्हणून मैदानात उतरविले आहे.
दुधनीचे नगराध्यक्ष प्रथमेश म्हेत्रे यांच्यासह १० नगरसेवकांनी सूचक म्हणून स्वाक्षरी केली आहे.
महायुतीतील शिवसेनेचे मोहोळचे रमेश बारसकर व पंढरपूरचे महेश साठे हे या निवडणुकीत
अपक्ष म्हणून मैदानात उतरले आहेत. यापैकी कोण उमेदवार कायम राहतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


0 Comments