Breaking News

सांगोल्यात न्यू इंग्लिश स्कूल मैदानात कोयता-रॉडने हल्ला; तरुणांसह ८ ते ९ जणांविरुद्ध ॲट्रॉसिटीसह गुन्हा दाखल

सांगोल्यात न्यू इंग्लिश स्कूल मैदानात कोयता-रॉडने हल्ला; तरुणांसह ८ ते ९ जणांविरुद्ध ॲट्रॉसिटीसह गुन्हा दाखल


सांगोला : शहरातील न्यू इंग्लिश स्कूलच्या मैदानावर जुन्या वादातून झालेल्या मारहाणीच्या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. लोखंडी रॉड, वाकडा कोयता 

आणि वेळूच्या काठीने दोघांवर हल्ला केल्याप्रकरणी सांगोला पोलिस ठाण्यात ८ ते ९ जणांविरुद्ध गंभीर कलमांसह ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत ज्ञानेश्वर आण्णा पारसे (वय २४, रा. सावे, ता. सांगोला) यांनी फिर्याद दिली आहे. या प्रकरणात यश गवळी, विनायक माने, समीर शेख यांच्यासह इतर ५ ते ६ जणांविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १९ मे २०२६ रोजी सकाळी सुमारे ११.४५ वाजण्याच्या सुमारास न्यू इंग्लिश स्कूल, सांगोला येथील मैदानावर ही घटना घडली. 

फिर्यादीच्या आत्याच्या मुलाला यापूर्वी मारहाण झाल्याने त्याचा जाब विचारण्यासाठी ज्ञानेश्वर पारसे व त्यांचे मित्र मैदानावर गेले होते. त्यावेळी “तू माझ्या नातलगाला का मारले?” असा जाब विचारताच वादाला सुरुवात झाली.

यावेळी आरोपी यश गवळी याने लोखंडी रॉडने फिर्यादीच्या डोक्यावर व पाठीवर वार केल्याचा आरोप आहे. भांडण सोडवण्यासाठी मध्ये पडलेल्या सौरभ सुरेश माने याला विनायक माने

 याने वेळूच्या काठीने डाव्या डोळ्याखाली मारहाण करून जखमी केले. तसेच समीर शेख याने फिर्यादीच्या उजव्या हातावर वाकड्या लोखंडी कोयत्याने वार केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

याशिवाय इतर ५ ते ६ जणांनी शिवीगाळ, दमदाटी करत लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला आहे. घटनेनंतर आरोपी तेथून पसार झाले.

या प्रकरणी सांगोला पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 118(1), 115(2), 189(2), 190, 191(2), 191(3), 

351(2), 351(3), 352 तसेच अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या घटनेचा पुढील तपास मंगळवेढा उपविभागाचे उपविभागीय पोलिस अधिकारी करीत आहेत.

Post a Comment

0 Comments