सांगोल्यातील कृषी साहित्य दुकान फोडून साडेतीन लाखांचा माल लंपास; अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल
सांगोला : सांगोला शहरातील वाढेगाव रोड परिसरात असलेल्या कृषी साहित्य दुकानात चोरीची मोठी घटना उघडकीस आली असून अज्ञात चोरट्यांनी दुकान फोडून
तब्बल ३ लाख ४६ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला आहे. या प्रकरणी सांगोला पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, राजापूर (ता. सांगोला) येथील व्यावसायिक संतोष दत्तात्रय पाटील (वय ४७) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे.
सांगोला-वाढेगाव रोडवरील अयोध्यानगरीसमोर असलेल्या “कृष्णा कृषी उद्योग”
या दुकानात २२ मे रोजी रात्री ८ वाजल्यापासून ते २४ मे रोजी सकाळी ८ वाजेच्या दरम्यान ही चोरी झाली.
चोरट्यांनी दुकानाच्या पाठीमागील बाजूचा पत्रा कापून व उचकटून आत प्रवेश केला.
त्यानंतर विविध कंपन्यांचे सबमर्सिबल केबल, सीसीटीव्ही डीव्हीआर आणि रोख रक्कम असा एकूण ३ लाख ४६ हजार रुपयांचा माल चोरून नेला.
चोरीस गेलेल्या मालामध्ये युनिल, RIZO, पॉलीकॉपर व जयकिसान कंपनीच्या सबमर्सिबल केबलचा मोठ्या प्रमाणात समावेश आहे.
तसेच दुकानातील सीसीटीव्ही डीव्हीआर आणि पाच हजार रुपयांची रोख रक्कमही चोरट्यांनी लंपास केली.
या प्रकरणी सांगोला पोलीस ठाण्यात गुरनं ४७६/२०२६ नुसार भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम ३३४ (१) प्रमाणे अज्ञात
चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ. २१८१ भोसले हे करत आहेत


0 Comments