मांजरीत मोठ्या जुगार अड्ड्यावर एलसीबीची धाड; १६ जण ताब्यात, तब्बल १ लाख ९० हजारांचा मुद्देमाल जप्त
सांगोला / प्रतिनिधी : सांगोला तालुक्यातील मांजरी परिसरात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने धाड टाकत १६ जणांना ताब्यात घेतले
असून, त्यांच्याकडून रोख रक्कम, मोबाईल व जुगार साहित्य असा एकूण १ लाख ९० हजार ४५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या कारवाईमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस कॉन्स्टेबल यश मधुकर देवकते यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, मा. वरिष्ठ पोलीस निरीक्षक
यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबीचे पथक अवैध धंद्यांवर कारवाईसाठी एकहतपूर बीट हद्दीत पेट्रोलिंग करत होते.
त्यावेळी बातमीदारामार्फत मांजरी येथील सांगोला-पंढरपूर मार्गावर असलेल्या “माऊली टी सेंटर व नाष्टा सेंटर” शेजारी काही इसम रम्मी जुगार खेळत असल्याची माहिती मिळाली.
माहितीची खातरजमा करून पोलिसांनी पंचांसह घटनास्थळी छापा टाकला असता, लिंबाच्या झाडाखाली दोन गटांमध्ये बसून
पैशांवर रम्मी खेळ सुरू असल्याचे निदर्शनास आले. पोलिसांनी तत्काळ गराडा घालून सर्वांना पकडले.
कारवाईदरम्यान मधुकर भडंगे, विठ्ठल नलवडे, योगेश शिनगारे, ज्योतीबा घोरपडे, धनंजय पाटील, साहील मुलाणी, मुरलीधर कांबळे, कुमार पवार,
संजय नाईकवाडी, मंगेश अंकुशराव, संजय गावडे, संतोष कांबळे, तालीफ मुजावर, किसन शिनगारे, सागर चव्हाण आणि बिरुदेव बुरंगे या १६ जणांना ताब्यात घेण्यात आले.
पोलिसांनी आरोपींकडून विविध कंपन्यांचे मोबाईल फोन, रोख रक्कम तसेच ५२ पानांच्या पत्त्यांचे संच जप्त केले.
तपासादरम्यान हा जुगार अड्डा नवनाथ गणपत शिनगारे हा चालवत असल्याची माहिती समोर आल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
या प्रकरणी सांगोला पोलिसांत महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.


0 Comments