जनगणना कर्तव्य बजावताना मृत्यू झालेल्या शिक्षकाच्या कुटुंबाला दिलासा; माजी आमदार दत्तात्रय सावंत यांच्याकडून १० लाख मदतीची घोषणा
सांगोला : जनगणना कर्तव्य पार पाडताना उष्माघातामुळे मृत्यू झालेल्या सांगोला विद्यामंदिर प्रशालेचे सहशिक्षक कै. राजाराम दामोदर ढोले यांच्या कुटुंबीयांना मदतीचा हात पुढे करण्यात आला आहे.
पुणे विभाग शिक्षक मतदारसंघाचे माजी आमदार दत्तात्रय अच्युतराव सावंत यांनी ढोले कुटुंबीयांची प्रत्यक्ष भेट घेऊन सांत्वन केले तसेच आर्थिक व शासकीय मदतीसाठी पुढाकार घेतला आहे.
कै. राजाराम ढोले हे सांगोला नगरपालिका हद्दीत जनगणनेचे कर्तव्य बजावत असताना उष्माघाताने बाधित झाले होते. उपचारादरम्यान त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे सांगोला तालुक्यासह संपूर्ण शिक्षण क्षेत्रात शोककळा पसरली आहे. विद्यार्थीप्रिय आणि कर्तव्यनिष्ठ शिक्षक म्हणून त्यांची ओळख होती.
माजी आमदार दत्तात्रय सावंत यांनी ढोले यांच्या कुटुंबीयांची भेट घेत त्यांना धीर दिला. तसेच त्यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असलेल्या “सोलापूर जिल्हा माध्यमिक शिक्षक व सेवक सहकारी पतसंस्था मर्या, बाळे”
या संस्थेच्या ‘संजीवनी योजना’ अंतर्गत ढोले कुटुंबियांना १० लाख रुपयांची आर्थिक मदत देण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले. त्यामुळे ही मदत लवकरच कुटुंबियांना मिळणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
याशिवाय, ढोले यांच्या कुटुंबीयांना शासनाच्या नियमानुसार अनुग्रह अनुदान मंजूर करावे, कुटुंबातील पात्र सदस्याला अनुकंपा तत्त्वावर शासकीय सेवेत सामावून घ्यावे
तसेच राज्य व केंद्र शासनाच्या विविध योजनांमधून मिळणारी सर्व आर्थिक मदत तातडीने उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी सावंत यांनी राज्याचे मुख्यमंत्री Devendra Fadnavis यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.
“कर्तव्य बजावताना शिक्षकाचा मृत्यू होणे ही अत्यंत वेदनादायी घटना आहे. शासनाने अशा कुटुंबांच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याची गरज आहे,” असे मतही सावंत यांनी व्यक्त केले.
कै. राजाराम ढोले यांच्या निधनामुळे सांगोला परिसरातील शिक्षक, विद्यार्थी आणि नागरिकांमध्ये हळहळ व्यक्त केली जात असून, त्यांच्या कुटुंबाला विविध स्तरांतून मदतीचा ओघ सुरू आहे.


0 Comments