डिजिटल मीडियाचा महामेळावा गोव्यात; ४ मे रोजी पणजीत राष्ट्रीय अधिवेशनाचा भव्य सोहळा
पणजी (गोवा) : देशातील डिजिटल मीडियाच्या क्षेत्रात कार्यरत असलेल्या संपादक आणि पत्रकारांचा भव्य मेळावा ४ मे २०२६ रोजी गोव्यात रंगणार आहे.
डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेचे तिसरे राष्ट्रीय महाअधिवेशन पणजी येथील कला अकादमीमध्ये सकाळी १० ते दुपारी ४ या वेळेत पार पडणार असून, या अधिवेशनाकडे देशभरातील पत्रकारांचे लक्ष लागले आहे.
या अधिवेशनाचे उद्घाटन गोवा राज्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, केंद्रीय ऊर्जा मंत्री श्रीपाद नाईक यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी गोव्याचे समाजकल्याण मंत्री सुभाष फळदेसाई, महाराष्ट्राचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील,
ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, उद्योग मंत्री उदय सामंत, गोव्याचे सांस्कृतिक मंत्री रमेश तवडकर, आमदार निलेश राणे यांसह अनेक मान्यवरांची उपस्थिती राहणार आहे.
संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजा माने यांनी दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, तेलंगाना, आंध्र प्रदेश, पंजाब आणि दिल्लीसह विविध राज्यांतून हजारो डिजिटल
मीडिया संपादक आणि पत्रकार या अधिवेशनात सहभागी होणार आहेत. त्यामुळे हे अधिवेशन डिजिटल मीडिया क्षेत्रातील एक ऐतिहासिक पर्व ठरणार आहे.
या अधिवेशनात उद्योग मंत्री उदय सामंत यांची विशेष प्रकट मुलाखत घेतली जाणार असून, डिजिटल मीडियाच्या विविध विषयांवर परिसंवादाचे आयोजनही करण्यात आले आहे.
यामध्ये अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे संविधानिक स्वरूप, समाजमाध्यमांचे न्यायालयीन प्रक्रियेतील स्थान आणि कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) चा डिजिटल मीडियातील वापर या महत्त्वाच्या विषयांवर तज्ज्ञांचे मार्गदर्शन मिळणार आहे.
तसेच, डिजिटल मीडिया क्षेत्रातील विविध मागण्यांवर चर्चा करून केंद्र व राज्य सरकारकडे ठराव सादर करण्यात येणार आहे. यामुळे डिजिटल पत्रकारितेला नवी दिशा मिळेल, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे.
🏆 राष्ट्रीय गौरव पुरस्कार २०२६ जाहीर
या अधिवेशनात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांना “राष्ट्रीय गौरव पुरस्कार २०२६” प्रदान करण्यात येणार आहे. यामध्ये गोवा, महाराष्ट्रासह विविध राज्यांतील सामाजिक, शैक्षणिक, प्रशासकीय व सांस्कृतिक क्षेत्रातील व्यक्तींचा समावेश आहे.
गोवंश संवर्धनासाठी कमलाकांत तारी, वैज्ञानिक क्षेत्रातील डॉ. महुवा शाह, उत्कृष्ट विधिमंडळ कार्यासाठी आमदार निलेश राणे, योग प्रसारासाठी कमलेश बांदेकर, तसेच समाजसेवा, कृषी, आरोग्य, उद्योग, ग्रामविकास आदी विविध क्षेत्रातील मान्यवरांचा या पुरस्कारांमध्ये गौरव होणार आहे.
📌 डिजिटल मीडियासाठी नवे पर्व
डिजिटल मीडियाच्या वेगाने बदलणाऱ्या युगात हे राष्ट्रीय अधिवेशन नवी दिशा देणारे ठरेल. पत्रकारांच्या समस्या, संधी आणि भविष्यातील आव्हाने यावर चर्चा होऊन ठोस निर्णय घेतले जातील.
त्यामुळे देशभरातील डिजिटल पत्रकारांना या अधिवेशनाचा मोठा फायदा होणार असल्याचे मत संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजा माने यांनी व्यक्त केले.


0 Comments