सांगोल्यात जिल्हा कराटे निवड स्पर्धेचा दिमाखदार शुभारंभ
सांगोला : शहरातील क्रीडा संकुलात आज (दि. 30 एप्रिल 2026) जिल्हास्तरीय कराटे निवड चाचणी स्पर्धेचे उत्साहात आयोजन करण्यात आले.
स्पोर्ट्स कराटे डो असोसिएशन, सोलापूर यांच्या वतीने कराटे डो असोसिएशन ऑफ महाराष्ट्र (KAM) व कराटे इंडिया ऑर्गनायझेशन (KIO) यांच्या मान्यतेने ही स्पर्धा पार पडली.
स्पर्धेचे उद्घाटन सांगोला पोलीस ठाण्याचे एपीआय सिकंदर वर्धन यांच्या हस्ते झाले. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना स्वसंरक्षण ही आजच्या काळाची गरज असल्याचे अधोरेखित केले. कराटे हा केवळ खेळ नसून आत्मसंरक्षणाचे प्रभावी साधन असल्याचे त्यांनी सांगितले.
स्पर्धेत कता व कुमिते (फाईट) या दोन्ही प्रकारांमध्ये खेळाडूंनी आपले कौशल्य दाखवले. वाघमारे सरांनी सांगोल्यातील कराटेचा गेल्या तीस वर्षांचा प्रवास उलगडत विद्यार्थ्यांना अधिकाधिक सहभागासाठी प्रेरित केले.
राष्ट्रीय पंच निजेंद्र चौधरी यांनी स्पर्धेतील कामगिरीत विशेष योगदान दिले. कार्यक्रमादरम्यान सुनील वाघमारे यांनी प्रमुख पाहुण्यांचे स्वागत केले, तर प्रास्ताविक व आभार प्रदर्शन जिल्हाध्यक्ष जी. के. वाघमारे यांनी मानले.
या स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांची नाशिक येथे 9 व 10 मे रोजी होणाऱ्या राज्यस्तरीय कराटे स्पर्धेसाठी निवड करण्यात आली असून, निवड झालेल्या खेळाडूंमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.



0 Comments