“अहिल्यादेवींच्या विचारांचा जागर; डॉ. गणपतराव देशमुख
महाविद्यालयात ३०१ वी जयंती प्रेरणादायी वातावरणात साजरी"
सांगोला : लोककल्याणकारी राज्यकारभार, सामाजिक न्याय आणि स्त्री सक्षमीकरणाचा आदर्श जगासमोर ठेवणाऱ्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची ३०१ वी जयंती डॉ. गणपतराव देशमुख महाविद्यालय,
सांगोला येथे अत्यंत उत्साहपूर्ण आणि प्रेरणादायी वातावरणात साजरी करण्यात आली. विद्यार्थ्यांमध्ये इतिहासातील आदर्श नेतृत्वाची जाणीव निर्माण करणारा हा कार्यक्रम ठरला.
कार्यक्रमाची सुरुवात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. संस्थेचे सदस्य प्रा. दीपक खटकाळे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सिकंदर मुलाणी, प्रा. चंद्रकांत इंगळे आणि प्रा. देविदास लवटे यांच्या हस्ते अभिवादन करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे प्रा. चंद्रकांत इंगळे यांनी आपल्या भाषणातून अहिल्यादेवी होळकर यांच्या न्यायप्रिय प्रशासनाचा, दूरदृष्टीपूर्ण नेतृत्वाचा आणि समाजहितासाठी
केलेल्या कार्याचा प्रेरणादायी आढावा घेतला. “विद्यार्थ्यांनी अहिल्यादेवींच्या विचारांचा अंगीकार करून समाजाभिमुख जीवन जगावे,” असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ. सिकंदर मुलाणी यांनी अहिल्यादेवींचे जीवन हे विद्यार्थ्यांसाठी प्रेरणास्थान असल्याचे सांगितले. शिक्षण, संस्कार, नेतृत्वगुण आणि समाजसेवा यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी सर्वांगीण विकास साधावा,
असे मत त्यांनी व्यक्त केले. तसेच महिला सक्षमीकरण आणि लोकसेवेचा आदर्श अहिल्यादेवींच्या कार्यातून पुढील पिढीसमोर उभा राहतो, असेही त्यांनी नमूद केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ. दीपक रिटे यांनी प्रभावीपणे केले. त्यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवनकार्याचा संक्षिप्त परिचय करून देत विद्यार्थ्यांना त्यांच्या कार्यातून प्रेरणा घेण्याचे आवाहन केले. आभार प्रदर्शन प्रा. डॉ. जयश्री काशीद यांनी केले.
यावेळी प्रा. डॉ. काकासाहेब घाडगे, न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य केशव माने, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी तसेच मोठ्या संख्येने विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होते.
या कार्यक्रमामुळे महाविद्यालय परिसरात प्रेरणादायी आणि उत्साहपूर्ण वातावरण निर्माण झाले असून विद्यार्थ्यांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या महान कार्याची नव्याने ओळख झाली.


0 Comments